‘लॉक अप 2’ या टीव्हीच्या लोकप्रिय शोमध्ये आता ‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा शिंदेची एण्ट्री झाली आहे. लॉक अपमध्ये येताच शिल्पाने सर्वांवरच निशाणा साधण्यास सुरुवात केली. मात्र तिने अभिनेता गोविंदाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकताच त्याची पत्नी सुनीता अहुजा भडकली. शिल्पा शिंदे तिच्या आक्रमकपणामुळे चर्चेत आली आहे. शोमध्ये तिला सुनीताकडून चांगली टक्कर मिळत आहे. गोविंदाचं नाव घेऊन ती सुनीताशी भांडायला गेली खरी, मात्र त्याबदल्यात तिलाच सुनीताकडून चार गोष्टी ऐकाव्या लागल्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. गोविंदाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचाही आरोप सुनीताने काही मुलाखतींमध्ये केला होता. यावरून शिल्पा तिला म्हणते, “लोकांनी त्यांचा गैरसमज करून घेतला आहे. गोविंदाची चाहती आहे, त्यामुळे मी एवढंच म्हणेन की, तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही असं कसं बोलू शकता? तुमच्या मनात काय चाललं होतं, हे तुम्हाला माहीत आहे.” त्यावर उत्तर देताना सुनीता तिला म्हणते, “कधी स्वत:ला माझ्या जागी ठेवून बघ. तुझ्यावर त्या गोष्टी जेव्हा ओढवतील, तेव्हा त्या अनुभवल्यावर तुला कळेल. हे माझं आयुष्य आहे. मला जे हवं ते मी करू शकते. तो माझा नवरा आहे. तो दहा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला जे हवं ते करेल, पण मी त्याला सोडणार नाही. मी मरेपर्यंत त्याच्यावर प्रेम करेन.”
पहा व्हिडीओ-
सुनीताने आक्रमकपणे दिलेलं हे उत्तर ऐकून शिल्पा पुढे वाद न घालता शांतपणे तिथून निघून जाते. ती गेल्यावर सुनीता राम कपूरसोबत शिल्पाबद्दल बोलते. “तो माझा नवरा आहे. तो काहीही करू शकतो. त्याच्या विरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी त्याची बायको आहे. हिला इथे उंगल्या करायलाच पाठवलेलं दिसतंय, अति केलं तर माझ्याकडून आणखी ऐकायला मिळेल. मी माझ्या लायकीवर येईन. माझ्या कुटुंबाला यात मधे आणू नका. माझ्या नवऱ्याने 50 अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय जातंय”, अशा शब्दांत ती सुनावते.
शोमध्ये येताच शिल्पा शिंदेनं तिचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. शिल्पाने आकांक्षा चमोलावरही कमेंट केली, तर शिवांगी जोशीवरही ती ओरडताना दिसली. या शोमध्ये सुनीता अहुजा तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना भावूक झाल्याचंही पहायला मिळालं. तेव्हा तिला सावरत सूत्रसंचालक फराह खान म्हणाली, “तू फक्त गोविंदाची पत्नी नाहीस, तर तू स्वत: एक सुपरस्टार आहेस.”