गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून ते राजकीय नेतेमंडळी या वादावर भाष्य करत आहेत. ‘सतलज’ हा चित्रपट सुरुवातीपासून वादात राहिला आहे. सेन्सर बोर्डाकडे हा चित्रपट अडकून पडला होता. अखेर तीन वर्षांनी हा चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण तिथूनही हा चित्रपट एका रात्रीत हटवण्यात आला. ‘सतलज’ हा चित्रपट आता पुढील आदेशापर्यंत भारतात पाहता येणार नाही. हा चित्रपट हटवण्याच्या निर्णयावरुन फक्त दिलजीत दोसांझच नाही, तर डायरेक्टर हनी त्रेहान सुद्धा चिडले आहेत. सामान्य जनतेच्या मनातही राग आहे. आतापर्यंत कोणाला हे समजलेलं नाही की, सतलज चित्रपट असा अचानक का हटवला? कोणाच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतला?. अखेर असं या चित्रपटात काय आहे, की ज्यावरुन ठरवलं की प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये. म्हणजे भारतात कोणालाच हा चित्रपट पाहता येऊ नये.
दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’वरुन काय घडलं, वाद काय आहे?. FWICE ने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्ष बीएन तिवारी यांनी दिलजीत दोसांझच्या चित्रपटाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दिलजीत बऱ्याचदा असे प्रोजेक्ट निवडतो, ज्यावरुन वाद निर्माण होतात असा तिवारी यांनी आरोप केला. ‘सतलज’ हा मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे.1984 ते 1994 दरम्यान पंजाबमध्ये हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जसवंत सिंह खालरा यांनी या अंत्यसंस्काराची चौकशी केली होती. 1995 साली जसवंत सिंह खालरा यांनाच किडनॅप करण्यात आलं. त्यांची हत्या करुन नदीत त्यांचा मृतदेह फेकण्यात आला. या प्रकरणात 2005 ,साली पंजाब पोलीस दलाच्या चार अधिकाऱ्यांना खालरा यांची किडनॅपिंग आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली. याच सत्य घटनेवर आधारित ‘सतलज’ सिनेमा तीन-चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रिलीज झाला. 3 जुलै 2026 रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर हा चित्रपट रिलीज झाला. पण रिलीजनंतर दोन दिवसात हा चित्रपट OTT वरुन हटवण्यात आला. स्वत: ZEE5 प्लॅटफॉर्मने यांची माहिती दिली. पुढील आदेशापर्यंत ‘सतलज’ भारतात रिलीज होणार नाही.
जसवंत सिंह खालरा यांच्यासोबत काय झालेलं?
जसवंत सिंह खालरा एक मानवाधिकार कार्यकर्ते होते. त्या काळात त्यांनी पंजाबमध्ये चालणारे फेक एन्काऊंटर आणि गुपचूपपणे होणाऱ्या बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी दहशतवाद आणि कट्टरतेने टोक गाठलेलं. त्यांनी 22 हजार युवा शीख मुलांसाठी आवाज उठवला. हजारो बेवारस मृतदेह जाळून टाकण्याविरोधात आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक स्मशानभूमींमध्ये जाऊन चौकशी केली, आकडे गोळा केले. पोलिसांनी त्यांचं किडनॅपिंग करुन फेक एन्काऊंटर केलं. 6 सप्टेंबर 1995 रोजी पोलीस खालरा यांना त्यांच्या घरातून उचलून घेऊन गेले. त्यांना मारुन त्यांचा मृतदहे नदीत फेकून दिला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. त्यानंतर चार पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अन्य सात आरोपींना सात-सात वर्ष कैदेची शिक्षा झाली.
चित्रपट का हटवला? सरकारी अधिकाऱ्याने काय सांगितलं?
‘सतलज’ला OTT वरुन का हटवलं, त्याचं कारण एका सरकारी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. ‘सतलज’ च्या मेकर्सनी 2022 साली ओरिजिनल टायटल ‘पंजाब 95’ अंतर्गत सेंसर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. पण CBFC ने सुचवलेले 127 कट्स मान्य केले नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली. मेकर्सनी त्या कट्सवर काहीच केलं नाही. मग गपचूप चित्रपटाचं नाव बदलून ‘सतलज’ या टायटलसह OTT वर रिलीज केलं. OTT हे सेन्सर बोर्डाच्या अधिकाक्षेत्रात येत नाही. हा प्रकार सरकारच्या लक्षात आला, तेव्हा ZEE5 चित्रपट काढण्याचे आदेश दिले. सुरक्षेच्या कारणास्तव हे आदेश दिले गेले. ओटीटी प्लेटफॉर्मला मार्गदर्शकतत्वांचं पालन करण्यास सांगण्यात आलं. जर, त्यांना चित्रपट थिएटर आणि OTT वर रिलीज करायचा असेल, तर नियमांचं पालन करावं लागेल.
‘सतलज’च्या दिग्दर्शकांनी काय म्हटलं?
‘सतलज’ चित्रपटावर असलेली बंदी आणि OTT वरुन अशा प्रकारे तडकाफडकी हटवण्याच्या निर्णयामुळे दिग्दर्शक हनी त्रेहान यांना मोठा धक्का बसला आहे. माझ्या चित्रपटामुळे कोणाला अडचण आहे, ते लोक कोण आहेत, ज्यांनी OTT वरुनही सतलज हटवला. मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत ‘सतलज’ वादावर ते बोलले. “जर, कोणी मला विचारलं चित्रपटापासून कोणाला अडचण आहे, तर खरच सांगतो मला माहित नाही. कोणाचा चेहरा किंवा नाव समोर आलं नाही. जे काही झालं, ते थर्ड पार्टी किंवा वकिलांच्या माध्यमातून झालं. एकवेळ अशी आली, जेव्हा सगळी चर्चा थांबली. इतक्या सर्व चढ-उतारानंतर चर्चा करण्यासाठी काही शिल्लक राहिलं नव्हतं. त्यावेळी ZEE5 ने संपर्क साधला व चित्रपटाचं प्रदर्शन शक्य झालं”
माझ्या मनात कुठलाही कडवटपणा नाही
“माझ्या मनात कुठलाही कडवटपणा नाहीय. कधी-कधी तुम्हाला उत्तर मिळत नाहीत म्हणून तुम्ही भावनात्मकदृष्ट्या दु:खी होता. देश चालवणाऱ्या लोकांच्या जबाबदाऱ्या मोठ्या असतात. कधी-कधी ते सुद्धा हतबल असतात. मी त्या लोकांचा आणि त्यांच्या पदांचा सन्मान करतो” असं हनी त्रेहान म्हणाले.
दिलजीत दोसांझवरच प्रश्नचिन्ह
‘सतलज’च्या बंदीवर FWICE ने प्रतिक्रिया दिली. दिलजीत दोसांझवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. दिलजीत या चित्रपटात जसवंत सिंह खालरा यांच्या भूमिकेत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बीएन तिवारी यांनी दिलजीत दोसांझच्या चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “मला आश्चर्य वाटतं दिलजीता दोसांझ असे वादग्रस्त चित्रपट का निवडतो? त्याला अशा निर्णयांचा परिणाम समजला पाहिजे. तो पंजाबचा सुपरस्टार आहे. त्याने विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, जेणेकरुन त्याच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही. आज जगभरात त्याचे भरपूर चाहते आहेत” असं बीएन तिवारी म्हणाले.
त्याने देशाला सर्वात वर ठेवलं पाहिजे
“मला जितकी समज आहे त्यानुसार, फक्त पैसा आणि अन्य कुठल्या कारणांसाठी कलाकाराने असे सिनेमे करु नयेत. त्याने देशाला सर्वात वर ठेवलं पाहिजे. दिलजीत खूप टॅलेंटेड आहे. पण असे प्रोजेक्ट हातात घेण्याआधी त्याने जरुर विचार केला पाहिजे” असं बीएन तिवारी म्हणाले.
पंजाबच राजकारण तापलं
‘सतलज’ चित्रपट ZEE5 वरुन हटवल्यानंतर पंजाबच राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यातील मोठ्या राजकीय संघटनांनी तात्काळ हा चित्रपट रिलीज करण्याची मागणी केली आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं म्हटलं आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते सुखपाल सिंह खौरा ते सुखबीर सिंह बादल, अकाली दलचे दलजीत सिंह चीमा आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मिडिया प्रभारी बलतेज सिंह पन्नू यांनी सतलज चित्रपट हटवण्याची कठोर शब्दात निंदा केली आहे.