Last Updated:
Massive Landslide: केरळच्या वायनाड जिल्ह्यात कल्लडी बोगदा प्रकल्पाजवळ भीषण भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. काही सेकंदांत डोंगराचा मोठा भाग कोसळल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
वायनाड: केरळमधील वायनाड जिल्ह्यात सुरू असलेल्या कल्लडी बोगदा (टनल) प्रकल्पाच्या परिसरात मंगळवारी भीषण भूस्खलन झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, सात जण जखमी, तर सात जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून काही सेकंदांत डोंगराचा मोठा भाग कोसळून चिखल, दगड आणि मातीचा प्रचंड लोंढा मीनाक्षी पुलाच्या दिशेने वेगाने धावताना दिसत आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफसह विविध यंत्रणा घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कल्लडी बोगदा रस्ते प्रकल्पाचे काम सुरू असताना मीनाक्षी पुलाजवळील डोंगराचा भाग अचानक कोसळला. डोंगराच्या डाव्या बाजूच्या उतारावर, प्रकल्पाच्या मुख्य बांधकाम क्षेत्राबाहेर हा भाग अचानक खचला. अवघ्या तीन ते चार सेकंदांत माती आणि दगडांचा मोठा लोंढा मीनाक्षी पुलाच्या दिशेने वाहत आला. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही, असे या प्रकल्पाशी संबंधित एका अभियंत्याने सांगितले.
मीनाक्षी पुलाच्या दुसऱ्या बाजूला असलेले तांत्रिक पथक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र पुलाजवळील काही कामगार आणि कर्मचारी चिखल व मातीच्या लोंढ्यात अडकले. ज्या ठिकाणी भूस्खलन झाले तेथे प्रकल्पाचे कार्यालयही कार्यरत होते. दुर्घटनेच्या वेळी सात ते आठ कामगार संरक्षणाची कामे करत होते किंवा त्या परिसरातून जात होते. उतारावर लक्ष ठेवण्यासाठी चार ते पाच सुरक्षा रक्षक तैनात होते, तर दोन ते तीन अभियंते मुख्य बांधकाम क्षेत्राबाहेर काम पाहत होते.
12 जूनपासून बोगद्याचे खोदकाम पूर्णपणे बंद होते. त्या ठिकाणी केवळ उतार मजबूत करणे, संरक्षण भिंती उभारणे आणि सुरक्षिततेशी संबंधित कामे सुरू होती. भूस्खलनाच्या वेळी चिखल टाकण्याच्या निश्चित जागी सुमारे १५ कामगार गॅबियन वॉल (दगडी जाळीची संरक्षण भिंत) उभारणे आणि उतार मजबूत करण्याचे काम करत होते, असे प्रकल्प व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
#WATCH वायनाड, केरलम | भारी बारिश के बीच वायनाड-कल्लाडी टनल कंस्ट्रक्शन साइट पर भूस्खलन में छह लोग घायल हो गए; पुलिस और प्रशासन यहां खोज और बचाव अभियान चला रही है। NDRF की दो टीमें भूस्खलन वाली जगह के लिए रवाना हो गई हैं। pic.twitter.com/PUEZPjQduK
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2026
केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी दोन जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वायनाडमधील सर्व रुग्णालयांना जखमी कामगारांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे बहुतांश कामगार केरळबाहेरील राज्यांतील असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता मोकळा झाल्यानंतर बचावकार्य अधिक वेगाने पूर्ण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत स्थानिक नागरिकांना कोणतीही हानी झालेली नाही.
भूस्खलनानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन व बचाव पथक, पोलीस, वन विभाग तसेच स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्रीही वापरण्यात येत आहे.
VIDEO | Kerala: Landslide near Meenakshi Bridge at Kalladi, where work on a tunnel road project connecting Malappuram and Wayanad districts was going on. One killed, seven injured, another seven missing, says Kerala CM V D Satheesan. CCTV visuals of the incident.#KeralaNews… pic.twitter.com/4tUkNZCUz7
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2026
केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी या दुर्घटनेसाठी हवामानाचा इशारा न मिळाल्याला जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही प्रकल्प परिसरात साचलेला मोठ्या प्रमाणातील चिखल हटवण्यात ठेकेदाराने निष्काळजीपणा केला. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस आणि बचाव पथके आधीच घटनास्थळी पोहोचली असून अतिरिक्त बचाव पथकेही रवाना करण्यात आली आहेत. गरज पडल्यास त्रिशूर येथे तैनात असलेले संरक्षण दलही मदतीसाठी पाठवण्यात येणार आहे.
वायनाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने भूस्खलनग्रस्त परिसरातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. कल्लडी-मेप्पाडी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून विस्थापित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मेप्पाडी येथे करण्यात आली आहे.
भूस्खलनाची घटना सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर दुपारी 12.30 वाजता भारतीय हवामान विभागाने (IMD) वायनाडसाठी रेड अलर्ट जारी केला. याशिवाय शेजारच्या कोझिकोड जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला असून मलप्पुरम, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
छातीत धडकी भरेल, अवघ्या 4 सेकंदांत अख्खा डोंगर कोसळला; चिखल-दगडांचा महापूर; अंगावर काटे आणणारा Video
