Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत


Maharashtra Rain News : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी  जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. 

जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहण्याचा अंदाज

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते. 

जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

1 जून ते 7 जुलैपर्यंत देशात सरासरीच्या फक्त 89 टक्केच पाऊस 

1 जून ते 7 जुलैपर्यंत देशात सरासरीच्या फक्त 89 टक्केच पाऊस पडला आहे. तर राज्यात सरासरीच्या 101 टक्के पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे 7 जुलैपर्यंत राज्यात 277.7 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यात झालेल्या चांगल्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात राज्यात 279.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागवार आकडेवारी पाहायची तर कोकणात सर्वाधिक 1 जूनपासून सरासरीच्या 117 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात 1 जूनपासून सरासरीच्या 107 टक्के नोंद झाली आहे. जून महिन्यातील कमी पावसाची कसर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूर्ण झाली आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती ओढवण्याची शक्यता आहे. ऐन जुलै महिन्यात अद्याप मोठा पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात होताना दिसलेला नाही. विदर्भात सरासरीच्या फक्त 89 टक्के पाऊस झाला आहे तर मराठवाड्यात सरासरीच्या फक्त 71 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, 8 जुलैनंतर पावसाची तीव्रता राज्यात कमी होणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या:

महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी

https://www.youtube.com/watch?v=uFWZvOy8hV4



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *