सातारा : राज्यात मराठवाडा वगळता विविध विभागात जोरदार पाऊस सुरू असून मुंबई (Mumbai), उपनगरात पावसामुळे (Rain) शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत असून सातारा (mahabaleshwar) जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः कहर केला असून महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक मानला जात आहे.
यंदाच्या गेल्या 24 तासातील पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून, ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक रस्ते खचले, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील घाटरस्त्यांवर मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड आल्यामुळे काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरमध्ये झालेली 513 मिलिमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाच्या नोंदींपैकी एक ठरली असून, निसर्गाने आपल्या रौद्ररूपाचे दर्शन घडवले आहे.
दरम्यान, या विक्रमी पावसामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे महाबळेश्वर मधील धबधबे, वेण्णा लेक, तलाव दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे हा मुसळधार पाऊस नागरिकांसाठी मोठे संकट ठरत आहे. महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे.
अतिट गावात ढगफुटीसदृश्य पाऊस
खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे, या पुराचे पाणी अतिट गावातील मंदिर परिसरात आल्यामुळे भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. यावेळी पूर आलेल्या ओढ्या काठच्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा