प्रसाद जोशी म्हणाले, जगभरात आर्थिक प्रगतीचा मापदंड म्हणून जीडीपीचा विचार केला जातो. मात्र काही देशांमध्ये ग्रॉस नॅशनल हॅपिनेस या संकल्पनेलाही महत्त्व दिले जाते. वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान आणि भक्तिभाव हा कोणत्याही मोजपट्टीत मोजता येणार नाही. वारीचा अनुभव प्रत्यक्ष घेतल्याशिवाय तिचा खरा आनंद समजू शकत नाही.
त्यांनी मंदिराच्या रचनेचा दाखला देत भारतीय संस्कृतीतील देह हेच देवाचे मंदिर ही संकल्पना स्पष्ट केली. मंदिराचा पाया म्हणजे पाय, स्तंभ म्हणजे हात, गाभारा म्हणजे छाती, शिखर म्हणजे मस्तक, द्वार म्हणजे चेहरा आणि मूर्ती म्हणजे आत्मा अशी प्रतीकात्मक मांडणी भारतीय संस्कृतीत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठलाचा वास असल्याची भावना वारकऱ्यांमध्ये दृढ असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत इंद्रायणीपासून सुरू होणारा प्रवास चंद्रभागेच्या तीरावर आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनाने पूर्णत्वास जातो.
विठ्ठल नामस्मरणाच्या वैज्ञानिक बाजूवरही संशोधन करण्यात आल्याचे सांगताना जोशी म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या विठ्ठल विठ्ठल येणे छंदे या अभंगातून प्रेरणा घेऊन विठ्ठल या शब्दाच्या उच्चाराचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. भाषा, ध्वनिशास्त्र, हृदयाचे ठोके, रक्तदाब, ईसीजी, पल्स रेट आणि इतर वैद्यकीय निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या निरीक्षणांमध्ये विठ्ठल नामस्मरणामुळे तणावाची पातळी कमी होणे, हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणे आणि रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होत असल्याचे काही निरीक्षणांमध्ये आढळून आले.
मात्र त्यांनी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, याचा अर्थ हृदयविकार बरा होतो असा नाही. कोणत्याही आजारावरील वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून नामस्मरणाकडे पाहता येणार नाही. परंतु मानसिक शांतता, सकारात्मकता आणि हृदयाच्या कार्यक्षमतेला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
वारीतील टाळ-मृदंगाचा नाद, टाळ्या वाजविण्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सामूहिक नामगजर यांचाही मनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच ध्येयाने लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामात तल्लीन होतात. या सामूहिक भक्तीमुळे एक प्रकारची सामूहिक मानसशक्ती निर्माण होते, जी मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.
वारीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शिस्तबद्ध जीवनशैली. दररोज पायी चालणे, साधा आणि सात्त्विक आहार, निश्चित दिनक्रम, सामूहिक निवास आणि सर्वांशी समतेने वागण्याची सवय यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. वारीमध्ये श्रीमंत-गरीब, जात-पात, पद-प्रतिष्ठा यांचे भेद विरघळून जातात आणि सर्वजण ‘माऊली’ म्हणून एकमेकांना संबोधतात. हीच वारीची खरी सामाजिक ताकद असल्याचे जोशी यांनी सांगितले.
इंद्रायणीपासून चंद्रभागेपर्यंतचा प्रवास जलसंस्कृतीशीही जोडलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहत्या पाण्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे आणि पर्यावरणाशी असलेल्या संबंधांमुळे तीर्थक्षेत्रांची निर्मिती झाली असून भारतीय परंपरेतील अनेक धार्मिक संकल्पनांमागे वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे, असे त्यांनी नमूद केले.
विठ्ठलाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगताना त्यांनी सांगितले की, या मूर्तीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. समत्व, शांतता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारे हे लोकदैवत आहे. संत तुकाराम महाराजांच्या समचरणदृष्टी उभी विटेवरी या अभंगातूनही समानतेचा संदेश दिला आहे.
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून आनंद, आत्मशिस्त, सामूहिक जीवन, मानसिक स्वास्थ्य, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारी जीवनपद्धती आहे. प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा. कारण आंबा खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही त्याचप्रमाणे वारी केल्याशिवाय तिचा खरा आनंद अनुभवता येत नाही, असेही प्रसाद जोशी यांनी सांगितले.