काहीही झालं तरी..; धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी यांना शेवटचा संदेश काय होता? – Marathi News | Hema malini revealed dharmendra last message sunny deol bobby deol family dispute said we do not pretend


धर्मेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, बॉबी देओलImage Credit source: Instagram

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्याविषयी आणि कुटुंबातील नात्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता, याचाही खुलासा त्यांनी केला आहे. “काहीही झालं तरी कुटुंबासोबत राहा. कितीही काम असलं तरी कुटुंबाला प्राधान्य दे”, असा संदेश धर्मेंद्र यांनी दिल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं. यावेळी हेमा मालिनी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “धर्मेंद्रजींनी मला सांगितलं की, काहीही झालं तरी कुटुंबासोबत राहा. माझ्याकडे कितीही काम असलं तरी मी कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे. सनी आणि बॉबी दोघंही खूप चांगले आहेत. बॉबी खूप चांगला आहे. आम्ही नेहमी एकत्र असतो. आम्ही प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. आम्ही दिखावा करत नाही. आमचं खूप चांगलं जमतं. आमचं नातं खूप घट्ट आहे. आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत. धरमजींना त्यांचं वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर आणायला कधीच आवडत नसे.”

या मुलाखतीत हेमा मालिनी यांना असंही विचारण्यात आलं की, एकेकाळी त्या इंडस्ट्रीतल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. यावर त्या म्हणाल्या, “तुम्हाला हे कोणी सांगितलं? मला खूप कमी मानधन मिळायचं. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मी आवडायचे. पण मी कधीही पैशांसाठी काम केलं नाही. जसजशी तुम्हाला प्रसिद्धी मिळते, तसतसं ते तुमचं मानधन हळूहळू वाढवतात. आज इतर सर्वांना जेवढं मानधन मिळतं, तेवढं तेव्हा मिळत नव्हतं.”

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जेव्हा सनी देओल-बॉबी देओल यांनी वेगळी शोकसभा आयोजित केली आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुलींसह वेगळ्या शोकसभेचं आयोजन केलं, तेव्हा पुन्हा एकदा देओल कुटुंबीयांसोबतच्या वादाच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत फेटाळलं होतं. “आमच्यातलं नातं कायम चांगलं आणि सलोख्याचं राहिलं आहे. आजही ते तसंच आहे. आमच्यात काहीतरी बिनसलंय असं लोकांना का वाटतं, हेच मला समजत नाही. कारण लोकांना गॉसिप हवं असतं. अशा लोकांना मी का उत्तर देऊ? मी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे का? मी का देऊ? हे माझं आयुष्य आहे. माझं खासगी आयुष्य आहे, हे आमचं खासगी आयुष्य आहे. आम्ही खूप आनंदी आहोत”, असं उत्तर त्यांनी दिलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *