Mumbai Pune Missing Link Update पुणे : पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर मध्यरात्री साडे तीन वाजता दरड कोसळली आहे. एमएसआडीसीकडून दरड हटवण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. दरड कोसळल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी आणि मुंबईच्या दिशेने येणारी अशी सगळी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दरड कोसळलेल्या या ठिकाणाची जाऊन पाहणी केली आहे. दरड कोसळली असली तरी मुख्य मिसिंग लिंक टनेलला कुठलही नुकसान झालेलं नाही. काम युद्ध पातळीवर सुरू आहे काही वेळानंतर पुणे ते मुंबई मिसिंग लिंक मार्ग देखील सुरू होईल अशी माहिती शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली आहे.
प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची : शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, तर अजून एक हे सगळं क्लियर व्हायला दोन तीन तास लागतील. आता थोडं पोलीस डिपार्टमेंट इथं आहे, ट्रॅफिकचे लोक आहेत.आता इथं पाण्याचा आपण प्रवाह बघतोय, ते बघून किती लेन सुरू करायच्या? कसं सुरू करायचं ते पोलीस डिपार्टमेंट ठरवेल, कारण प्रवाशांची सुरक्षा राहिली पाहिजे. आता एवढ्या वेळेमध्ये वरुन काही अजून काही खाली आलेलं नाहीये पण पाऊस चालू आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं.
तंत्रज्ञानामुळं घटना घडली तेव्हाच अलर्ट मिळाला
दुसरं म्हणजे वर जाऊन फार पाहता येत नाही कारणं डोंगरात धुकं आहे. पाऊस, धुकं आणि वारं तिन्ही गोष्टी जरा आपल्या कामाच्या विरोधात आहेत. मात्र, लवकरात लवकर एक दोन तीन तासानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय होईल. महत्त्वाचं म्हणजे स्ट्रक्चरल कुठेही इथं कशालाही डॅमेज नाही. आपण टेक्नॉलॉजी वापरली आहे. साडेतीन वाजता हे झाल्या झाल्या कंट्रोल रूमला कळाल्या कळाल्या लगेच कंट्रोल रूमने अलर्ट दिला आणि लगेच वाहतूक वळवली, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं.
आपण जी टेक्नॉलॉजी वापरली, जे काही कॅमेरे वगैरे, जे काही सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत त्यामुळं ताबडतोब माहिती मिळवाली आणि वाहतूक वळवली. शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गाच काय असत आपण सांगू शकत नाही. सुरक्षितेच्या बाजूने दोन्ही इकडच्या आणि दोन्ही तिकडच्या मार्गिका तपासल्या जातील आणि सुरक्षितता जपली जाईल.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं राज्य सरकारकडून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे.