Last Updated:
Mumbai Pune Expressway Missing Link Landslide: ‘मुंबई पुणे एक्सप्रेस वे’ वरील मिसिंग लिंकच्या खंडाळा एक्झिटजवळ बोगदा क्रमांक १ च्या बाहेर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली.
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात आज पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर, खंडाळा एक्झिटजवळ बोगदा क्रमांक १ च्या बाहेर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. दरडीसोबत बोगद्याच्या कमानीचा काही भागही खाली आल्याने पुलावर आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि काँक्रीटचा ढिगारा साचला आहे.
या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुदैवाने, दरड कोसळली त्या क्षणी त्या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
मागील १५ तासांपासून दरड हटविण्याचे प्रयत्न सुरू
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचाव आणि साफसफाईचे काम सुरू असून तब्बल १५ तासांपासून दरड हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ढिगाऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने अजून पाच ते सहा तास लागू शकतात, प्राथमिक माहिती
सध्या चार गॅस कटर आणि चार जेसीबी मशीनच्या मदतीने कोसळलेली कमान आणि दरडीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, ढिगाऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच ते सहा तास लागू शकतात, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवर या घटनेचा मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घाटमाथा आणि डोंगराळ भागातील प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुंबई पुणे महामार्गावर जवळपास १०० टन मलबा पडला आहे. त्यामधील ७० टन मलबा सध्या हटविण्यात आला आहे. पुढच्या दीड-दोन तासात सगळा हटवला जाईल. मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी आता तीन लेन तर पुण्याकडून मुंबईकडे एक लेन चालू आहे. पुढच्या दीड-दोन तासात काम पूर्ण होण्याची आशा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
घटना कशी घडली? शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले
पहाटे साडे तीन वाजता घटना घडली. आपल्या कंट्रोल रुमच्या लगोलग लक्षात आल्याने बाकी वाहतूक लगोलग थांबविण्यात आली. आपण सुरक्षितेतच्या दृष्टीने उभारलेली यंत्रणा २४-७ काम करते आहे. यापूर्वी कधीही तिथे पाण्याचा प्रवाह नव्हता, मात्र आत्ताचा प्रवाह खूप जोरदार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठमोठे दगड आले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
Mumbai,Maharashtra
