बॉलिवूडमधील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी 'छैयाँ छैयाँ' हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. 'दिल से' या चित्रपटातील या गाण्यामुळे मलायका अरोराला मोठी लोकप्रियता मिळाली.
मात्र, या गाण्यासाठी सुरुवातीला अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची निवड करण्यात आली होती, असा खुलासा त्यांनी नुकताच केला. 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिल्पा शिरोडकर यांनी आपल्या कारकिर्दीतील हा प्रसंग सांगितला.
त्यांनी सांगितले की, कोरिओग्राफर फराह खान यांनी त्यांना 'छैयाँ छैयाँ' गाण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यासाठी 15 दिवसांत वजन कमी करण्याची अट घालण्यात आली होती.
शिल्पा म्हणाल्या की, अवघ्या 15 दिवसांत वजन कमी करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही प्रमाणात वजनही कमी झाले तरी ते पुरेसे नसल्याचे फराह खान यांनी सांगितले. त्यामुळे अखेर हे गाणे त्यांच्या हातातून गेले.
या आठवणींवर बोलताना शिल्पा यांनी स्पष्ट केले की, त्या काळात आपले वजन जास्त होते, त्यामुळे ही संधी गमवावी लागली. मात्र, फराह खान आजही गंमतीने आपले वजन 100 किलो होते असे सांगतात. पण प्रत्यक्षात तेवढे वजन कधीच नव्हते असे त्यांनी हसत-हसत स्पष्ट केले.




