विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची बिनविरोध विधानसभा उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सचिन अहिर यांच्या लेकीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये किरण अहिर या हिंदीमध्ये बोलत होत्या. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. पण किरण देखील शांत बसल्या नाहीत. त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
काय आहे किरण अहिर यांचा नवा व्हिडीओ?
किरण अहिर यांनी काल एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी वडिलांच्या कामगिरीला पाठिंबा दिला होता. मात्र, या व्हिडीओमध्ये त्या हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले. आता या ट्रोलर्सला उत्तर देत किरण यांनी मराठीमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या हो मला मराठी येते. माझ्या बाबांनी लहान पणापासून मला मराठी शिकवली आहे असे बोलताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत किरण म्हणाल्या की, मी अनेक लोकांच्या टिप्पण्या वाचल्या. खूप लोकांनी लिहिले आहे, “हिंदीत का बोलतेस? तुझ्या बापाने तुला मराठी शिकवली नाही का?” सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की, होय, मला मराठी येते. माझ्या वडीलांनी बालपणापासून मला मराठी बोलायला, वाचायला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करायला शिकवले आहे. याचा मला अभिमान आहे. पण मी हिंदीत बोलते कारण मला माझा संदेश फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण भारतापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, त्यानंतर कोणत्यातरी राज्याचे.
पुढे किरण यांनी लिहिले की, जर भाषा एवढी मोठी गोष्ट असेल, तर मग आपण हिंदी चित्रपट का बघतो? हिंदी गाणी का ऐकतो? मग भाषेचा मुद्दा फक्त राजकारणातच का उपस्थित होतो?
माझे मराठीवर तितकेच प्रेम आहे, जितके हिंदीवर. भाषेचे काम लोकांना जोडणे आहे, विभागणे नाही. शेवटी किरण यांनी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि। शुनि चैव” असे म्हटले आहे.
काय होता किरण यांचा जुना व्हिडीओ?
काल शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण म्हणाल्या होत्या की, माझ्या वडिलांनी पक्ष सोडला म्हणून टीका आणि तिरस्कार केला जात आहे. 2019 ला आदित्य ठाकरेंसाठी पक्ष सोडला आणि निष्ठेने पक्षात काम केलं त्याचं फळ आता मिळालं. माझ्या वडिलांबद्दल गेल्या काही दिवसापासून आरोप केले जात आहेत. माझ्या वडिलांना विचारलं जातंय की एवढी पद मिळाली तरी पक्ष का सोडला असे म्हटले. पक्षाने खूप काही दिलं याचा मी सन्मान करते. राजकारण म्हणजे राजकारण नाही तर जनसेवा करणे आहे. माझ्या वडिलांनी मेहनत निष्टेने काम केलं त्याचं फळ आता मिळालं आहे. माझ्या वडिलांनी 2019 ला आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्ष सोडला आणि त्यांना साथ दिली.