519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित – Marathi News | Spain goalkeeper Unai Simon has the longest shutout streak in World Cup history breaking 36 year old record


519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित Image Credit source: GETTY IMAGES

Spain goalkeeper Unai Simon: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत राउंड ऑफ 32 थरार रंगला असून या फेरीत स्पेनचा गोलकीपर उनाई सिमोनची चर्चा रंगली आहे. या फेरीत स्पेनचा सामना ऑस्ट्रियाशी झाला आणि हा सामना स्पेनने 3-0 ने एकतर्फी जिंकला. या विजयासह स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. असं असताना या सामन्यात स्पेनच्या 29 वर्षीय गोलकीपर उनाई सिमोनने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या कामगिरीची दखल फुटबॉलप्रेमींनी घेतली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात इतका दीर्घ काळ एकही गोल गोलपोस्ट जाऊ न देणारा गोलकीपर ठरला आहे. त्याने या कामगिरीसह 36 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेत चौथ्यांदा म्हणजेच चौथ्या सामन्यात एकही गोल आपल्या गोलपोस्टमध्ये जाऊ दिला नाही. यासह त्याने फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे.

उनाई सिमोनची 519 मिनिटे झुंजार खेळी

उनाई सिमोनच्या मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेतील आकडेवारी काढली तर मैदानात 519 मिनिटं झुंज दिली आहे. या दरम्यान कोणत्याही संघातील फुटबॉलपटूला गोलपोस्टमध्ये गोल मारता आला नाही. यासह सिमोनने इटलीचा महान गोलकीपर वॉल्टर जेंगा याने 1990 मध्ये नोंदवलेला विक्रम मोडीत काढला आहे. जेंगाने मायदेशात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत 517 मिनिटं विरोध संघातील फुटबॉलपटूंना एकही गोल करू दिला नव्हता. हा विक्रम गेल्या 36 वर्षांपासून अबाधित होता. मात्र हा विक्रम आता उनाई सिमोनच्या नावावर झाला आहे.

ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये सुरूवातीच्याा काही मिनिटाता सिमोनने स्पेनचा गोलकीपर इकर कॅसिआसलाही मागे टाकलं. कॅसिआसने 2010 आणि 2014 मध्ये स्पेनसाठी क्लीन रेकॉर्ड ठेवला होता. आश्चर्याचा बाब म्हणजे, ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात सिमोनला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. कारण एकही चेंडू शॉट ऑन टार्गेटवर लागला नाही. त्यामुळे सिमोनला अडवण्याची गरजच भासली नाही. .या स्पर्धेत स्पेनविरुद्ध विरोधी संघाने फक्त चार अचूक शॉट मारले. ते सिमोनने अडवले.

सिमोनमुळे दिग्गज गोलरक्षक बेंचवर

स्पेनमध्ये गोलरक्षकाच्या जागेसाठी तीव्र स्पर्धा आहे. कारण युरोपमधील दोन मोठ्या क्लबचे चॅम्पियन गोलरक्षक बेंचवर बसले आहेत. आर्सेनलसाठी सलग तीन प्रीमियर लीग गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार जिंकणारा आणि यावर्षी गनर्सना विजय मिळवून देणारा राया हा स्पेनच्या संघात राखीव खेळाडू आहे. बार्सिलोनासाठी खेळणारा आणि जगातील सर्वोत्तम युवा गोलरक्षकांपैकी एक असलेला गार्सिया बेंचवर बसला आहे. संघात अनुभवी गोलरक्षक असताना प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांचा सिमोनवर विश्वास आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *