घरात खूप मोठा हंगामा, रडारड..; सुझानने हृतिककडून घेतली 400 कोटींची पोटगी? बहिणीने सांगितलं सत्य – Marathi News | Sister Farah Khan ali reveals about sussanne khan taking rs 400 crore alimony from hrithik roshan during divorce rumours


अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्याच वर्षी डिसेंबर 2000 मध्ये हृतिकने सुझानशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. 2014 मध्ये जेव्हा हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले, तेव्हा पोटगीची जोरदार चर्चा झाली होती. सुझानने हृतिककडून तब्बल 400 कोटी रुपये पोटगी घेतल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा सर्वांत महागडा घटस्फोट असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझानची बहीण आणि ज्वेलरी डिझायनर फराह खान अलीने या चर्चांवर पहिल्यांचा प्रतिक्रिया दिली आहे.

बहीण सुझान खानने घटस्फोटाच्या वेळी हृतिक रोशनकडून एकही रुपया घेतला नसल्याचं फराहने स्पष्ट केलं. तिने पोटगीसंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. इतकंच नव्हे तर घटस्फोटाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरही सुझान आणि हृतिकमध्ये अत्यंत आदरपूर्वक नातं राहिल्याचं ती पुढे म्हणाली. विशेष म्हणजे त्याच वेळी फराहचाही तिचा पती डीजे अकीलसोबत घटस्फोट होत होता.

दोन्ही बहिणींच्या संसारात वाद

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत फराह म्हणाली, “2012 मध्ये माझ्या आणि अकीलच्या संसारात वाद सुरू झाले होते. मला माझ्या आईवडिलांना याबद्दल सांगायचं होतं, पण त्याचवेळी 2012 मध्ये हृतिक आणि सुझान यांच्याही वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. सुझानने माझ्या आधीच आईवडिलांना तिच्या घटस्फोटाविषयी सांगितलं. त्यामुळे मीसुद्धा घटस्फोट घेतेय, असं सांगून मला त्यांना दुसरा धक्का द्यायचा नव्हता. त्यामुळे मी शांत राहण्याचा आणि आमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यावेळी हृतिक, सुझान यांच्याबाबत आधीच खूप ड्रामा सुरू होता. जेव्हा हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर 2016 मध्ये मी आईवडिलांना माझ्याविषयी सांगितलं होतं. सुदैवाने त्यावेळी आई-वडिलांनी दोघांनी आम्हाला समजून घेतलं.”

400 कोटी रुपयांची पोटगी?

हृतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटाबद्दल वडील संजय यांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न पुढे विचारला असता फराहने सांगितलं, “घरात हंगामा झाला होता. कारण प्रत्येकासाठी तो खूप मोठा धक्का होता. घरात खूप रडारड झाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं होती, पण माझ्या मते त्या दोघांनी ते सर्व चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला होता. मी ऑन-रेकॉर्ड ही गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की, सुझानने पोटगी म्हणून हृतिककडून 400 कोटी रुपये घेतले नाहीत. जेव्हा मी ऑनलाइन अशा बातम्या वाचते, तेव्हा मला फार दु:ख होतं. ही किती खोटी गोष्ट आहे. माझ्या बहिणीने एकही पैसा घेतला नाही. आम्ही अशा कुटुंबातून आणि अशा आईकडून आलो आहोत, ज्यांनी आम्हाला शिकवलंय की, भौतिक गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, नाती अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळे माझ्या बहिणीने काहीही घेतलं नाही.”

हृतिक-सुझानचं नातं

“सुझानचं आजही हृतिक, तिचे पूर्व सासू-सासरे यांच्यासोबतचं नातं खूप चांगलं आहे. ते तिच्यावर प्रेम करतात. ती पैशांसाठी लग्न करणारी नाही. ती खूप सुसंस्कृत आहे. हृतिकसुद्धा उत्तम माणूस आहे. त्यांचं नातं टिकलं नाही, पण प्रसिद्धीसाठी कोणीच आपला संसार उद्ध्वस्त करत नाही. यामध्ये पोटगीचा कोणताही प्रश्न नव्हता. हे चुकीचं आणि पूर्णपणे अयोग्य आहे. मी तिला विचारलं की, तू हे सगळं स्पष्टपणे नाकारत का नाहीस? त्यावर ती मला म्हणाली, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याची मला पर्वा नाही. मला जे करायचं असतं ते मी करते. जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात काही मूल्य आणत नाही, तोपर्यंत मी काय करते याने तुम्हाला काही फरक पडायला नको. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, यानेही मला काही फरक पडायला नको”, असं फराहने पुढे सांगितलं.

हृतिकने ‘कहो ना प्यार हैं’ या पहिल्याच चित्रपटानंतर लगेच सुझानशी लग्न केलं होतं. पदार्पणानंतर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. पण त्याचवेळी हृतिक आणि सुझान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांना लग्न करायचं होतं. हृतिक सुपरस्टार असल्यामुळे त्याच्या आईवडिलांना त्याने लग्नासाठी थोडा वेळ थांबावं असं वाटत होतं. मात्र हृतिक लग्नाच्या निर्णयावर ठाम होता, असं फराहने स्पष्ट केलं. घटस्फोटानंतर सुझान आता अर्सलान गोणीला डेट करत आहे. तर हृतिकच्या आयुष्यात अभिनेत्री सबा आझाद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *