Ashadhi Ekadashi 2026: आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचे… आषाढी एकादशीचे…आणि पंढरीच्या वारीचे…. वैदिक पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. ही एकादशी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी मानली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीविठ्ठलाच्या भक्तांसाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात वारी करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करून येतात. त्यामुळे हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि समतेचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यंदा आषाढी एकादशी कधी आहे? आणि पंढरीची वारी कधीपासून सुरू होणार? तिथी, महत्त्व, मुहूर्त, वारी वेळापत्रक जाणून घ्या…
आषाढी एकदशी कधी आहे? धार्मिक महत्त्व जाणून घ्या…(Ashadhi Ekadashi 2026)
आषाढी एकादशी… देवशयनी एकादशी…शयनी एकादशी… अशा नावांनी ओळखला जाणारा हा दिवस भगवान श्रीविष्णूंना समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, 2026 वर्षात आषाढी एकादशी शनिवार, 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विष्णुभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाचा प्रारंभ होतो.
आषाढी एकादशी 2026 तिथी, शुभ मुहूर्त
आषाढी एकादशीचे व्रत करताना तिथी आणि पारणाची वेळ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
एकादशी तिथी प्रारंभ : 24 जुलै 2026 सकाळी 9:15 वाजता
एकादशी तिथी समाप्त : 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:35 मिनिटांनी..
पारणाची वेळ
व्रताचे पारण: 26 जुलै 2026 सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत करणे शुभ मानले जाते.
आषाढी वारी 2026 चे वेळापत्रक
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला विशेष स्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येतात. ही वारी भक्ती, समता, सेवा, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देते. 2026 वर्षासाठी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाणून घेऊया…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – देहू पालखी प्रस्थान तारीख
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 7 जुलै 2026 रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. हा सोहळा पुणे, लोणी काळभोर, बारामती, इंदापूर, अकलूज आणि वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचतो.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – आळंदी पालखी प्रस्थान तारीख
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सुमारे 17 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
आळंदी
पुणे (भवानी पेठ)
सासवड
जेजुरी
वाळे
लोणंद
तरडगाव
फलटण
बरड
नातेपुते
माळशिरस परिसर
वाखरी
पंढरपूर
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग
देहू
आकुर्डी
पुणे
लोणी काळभोर
यवत
वरवंड
बारामती
इंदापूर
अकलूज
वाखरी
पंढरपूर
पंढरपूरात पालख्या दाखल कधी होणार?
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. या वारीतील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो दिंड्या, टाळ-मृदंग, भगव्या पताका आणि विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने निघालेला हा भक्तिमार्ग महाराष्ट्राच्या एकात्मतेचे दर्शन घडवतो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्या 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी एकत्र येतील
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे?
- धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धापूर्वक केलेल्या या व्रतामुळे पापांचा नाश होतो
- भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.
- या दिवशी पहाटे स्नान करून भगवान विष्णू – विठ्ठलाची पूजा करावी.
- दिवसभर नामस्मरण, जप, भजन व विष्णुसहस्रनामाचे पठण करावे.
- तांदूळ, गहू, डाळी आणि धान्ययुक्त पदार्थ टाळावेत.
- फळाहार किंवा निर्जला उपवास श्रद्धेनुसार करावा.
- राग, मत्सर, असत्य आणि वाईट विचारांपासून दूर राहावे.
- द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारण करून व्रत पूर्ण करावे.
हेही वाचा :
Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)