BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग



सचिनभाऊंची परवा विधानपरिषद उपसभापतीपदी (Sachin ahir) निवड झाली आणि 5-6 वर्षांपूर्वी मित्रासोबत विधिमंडळात त्यांची झालेली भेट आठवली. कारण, कोरोना लॉकडाऊनपासून बंद असलेली आमच्या बार्शीतील मिल (Mill) सुरू करण्यासाठी प्रयत्न करा असं मी त्यांना म्हटलं होतं, अर्थात आमच्या आमदार, खासदारांनी प्रयत्न केले होतेच. पण, सचिनभाऊ हे इंटकचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यासोबतच्या भेटीत तोच महत्त्वाचा विषय वाटल्याने मी त्यांना बोललो. त्यावर, अरे बाबा तुझ्या बार्शीचंच नाही आम्हाला NTC च्या देशातल्या सगळ्या मिल सुरु करायच्या आहेत, आमच्या मुंबईतल्यापण बंद आहेत, पण दिल्लीवाले काय मनावर घेत नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले होते. आता, सचिनभाऊ पंतप्रधान मोदीजींच्या मित्र पक्षात आले आहेत, विधानपरिषद उपसभापती देखील झाले. त्यामुळे, आता त्यांच्याकडून हा प्रश्न लवकर मार्गी निघेल, देशातील 23 गिरण्यांचा भोंगा वाजेल, कामगारांना न्याय मिळेल ही गिरणीकामगाराच्या मुलाची अपेक्षा आहे. 

मुंबईसह देशातील जवळपास 23 सरकारी गिरण्या कोरोना लॉकडाऊनपासून बंद आहेत, त्या आजही बंदच आहे. 20 हजार गिरणी कामगारांचा हा प्रश्न आहे, ज्यात आमच्या बार्शीतील 400 मिल कामगारांचे संसार देखील 6 वर्षांपासून कसे सुरू आहेत, हे त्यांनाच माहिती. आता, या कामगारांच्या संघटनेचे (इंटकचे) अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर. मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील सचिनभाऊंच्या कामगार नेतृत्वाचे कौतुक केले, सचिनभाऊ म्हणजे तळागाळातील लोकांसाठी, कामगारांसाठी काम करणारं नेतृत्व असल्याचं सभागृहात सांगितलं. त्यामुळे, साहजिकच आता उपसभापतीपदी विराजमान झाल्यानंतर सचिनभाऊंकडून 20 हजार कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  

बच्चू कडू, ओमराजेंसह, सचिनभाऊंचे प्रयत्न

आमदार बच्चू कडू यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी शिवसेना पक्षात प्रवेश केला, त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरेंना सोडत सत्ता जवळ केली. आता, सचिनभाऊंनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत ते उपसभापतीपदी विराजमान झाले. मुद्दामहून आ. बच्चू कडू आणि खा. ओमराजे निंबाळकर यांचे नावं इथं लिहतोय. कारण, अचलपूर मतदारसंघात एनटीसीची फिनले मिल बंद आहे, ज्यासाठी बच्चू कडूंनी अनेकदा मंत्रालयीन स्तरावर प्रश्न उपस्थित केला, दुसरी मिल बार्शीमध्ये आहे, जिथले खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही संसदेत मिल सुरू करण्यासाठी आवाज उठवला, पण मोदी सरकारने काही ऐकलं नाही, भाऊ तुम्ही देखील 2022 मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर मिल सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते, तरीही मिल काही सुरू झाल्या नाहीत, याउलट कामगारांचे पगार 10 ते 11 महिन्यांपासून थकलेले आहेत. त्यामुळे, आता आपण तिन्ही नेते एकाच पक्षात आहात, सत्ताधारी पक्षात विशिष्ट स्थानावर आहात. सत्तेत गेल्यावर प्रश्न सुटतात, विरोधात केवळ आंदोलने करावी लागतात हे सर्वजण सांगतात. त्यामुळेच, आता आंदोलनं न करता आपण सर्वांनी मिळून गिरणी कामगारांचा हा पश्न कायमचा मार्गी लावावा, काय तो सोक्षमोक्ष करुन टाकावा. म्हणजे, कधीतरी मिलचा भोंगा वाजेल या आशेवर असलेल्या गिरणीकामगारांना एकदाचे उत्तर मिळेल.

सचिनभाऊंचंही दिल्लीत आंदोलन

सचिनभाऊ, मार्च 2022 मध्ये आपण स्वत: दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत, केंद्र सरकारचा निषेध केला होता. या आंदोलनात देशभरातून 23 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर, जानेवारी महिन्यात कोयंबतूर येथेही आंदोलन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्राचे नेते पियुष गोयल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री असताना देखील हा प्रश्न सुटला नाही. आता, गिरिराज सिंह हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत, आता तुम्ही त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवाल ही अपेक्षा आहे, कारण तुम्ही सत्तेत पोहोचला आहात, एका महत्त्वाच्या पदावर बसला आहात, आणि हा प्रश्न मोदींजींच्या जवळ सहज पाहोचवाल एवढीच गिरणीकामगाराचा लेक म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. आता, आपण मुख्यमंत्री देवाभाऊं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरुन हा प्रश्न सोडवावा ही विनंती. 

महाराष्ट्रातील 6 मिल्स बंद, मुंबईतील तीन

मुंबईतील इंडिया युनायटेड नंबर 5, टाटा, सीताराम-पोद्दार, दिग्विजय या चार तर बार्शी टेक्स्टाईल्स मिल्स आणि अचलपूरमधील फिनले मिल्स या दोन अशा एकूण 6 गिरण्या बंद आहेत. मुंबईतील या गिरण्या मध्यवर्ती जागेत आहेत. त्यामुळे, शेकडो एकरचा परिसर या गिरण्यांनी व्यापला असून मोठी जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. कदाचित या जागांमुळेच गिरण्या सुरू न करण्याचा डाव आखला जातोय की काय, अशी शंकाही उपस्थित होत आहे. या गिरण्यांमधील हजारो कामगार देखील सध्या बेरोजगार आहेत, आता अनेकांनी आपल्या रोजगाराचा पर्याय शोधलाय, तर मिल सुरु होईल, या आशेनं काहींनी जगाला कायमचा निरोप दिलाय. अनेकांनी हमाली, भाजीविक्री, रिक्षा, मजुरी, पानटपरी असे किरकोळ उद्योग सुरू केले आहेत. मात्र, मिलचा भोंगा वाजणार, या आशेवर उरला-सुरला गिरणी कामगारही संपून जात आहे.

31 मार्च 2022 रोजी खासदार अरविंद सावंत यांनी ससंदेत हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा भाऊ तुम्हीच हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला होता. आता, मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन तुम्ही हा प्रश्न मोदींजींपर्यंत पोहोचवावा आणि देशातील 20 हजार कामगारांना, तुमच्या संघटनेच्या कामगारांना न्याय द्यावा, तरच तुमचं पक्षांतर, सत्तेत जाणं सार्थकी ठरेल एवढीच अपेक्षा.  

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *