थकून घरी आलं की पुण्याजवळच्या त्या छोट्याशा गावात कमलाआजींच्या स्वयंपाकघरात एक गोष्ट हमखास असायची—गरमागरम वरण-भात. कधी मुगाची मऊ खिचडी. त्यावर साजूक तुपाची धार आणि बाजूला लिंबाची फोड. घरातली तरुण मंडळी मात्र जिम, डाएट आणि प्रोटीनच्या चर्चा करत म्हणायची, ‘आजी, बॉडी बनवायची असेल तर अंडी, चिकन किंवा प्रोटीन पावडर लागते. या साध्या डाळ-भातात काय आहे?’ कमलाआजी हसायची. ताटात वरण-भात कालवायच्या आणि म्हणायच्या, ‘अरे, पोटाला आणि अंगाला ताकद देणारी प्रत्येक गोष्ट महाग असतेच असं नाही.’ तेव्हा हे फक्त अनुभवाचं बोलणं वाटायचं. पण आज पोषणशास्त्राकडे पाहिलं तर त्यामागे एक महत्त्वाचं वैज्ञानिक कारण दिसून येतं.
