राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला ठाकरे गटाचा एक आमदारही लागला. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून काही नावे चर्चेत होती. शिवसेना ठाकरे गटाकडे विधान परिषदेचे उपसभापतीपद महायुतीमधून गेले. सतत दोन नावे चर्चेत होती. मात्र, अचानक असे काही घडले की, कोणालाही काहीही कल्पना नसताना ठाकरे गटाच्या सचिन आहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सचिन आहिर यांना उपसभापतीपदासाठी उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. सचिन आहिर थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची साथ सोडतील, असे कोणालाही वाटले नव्हते.
शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर अजूनही सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले. शिवसेना ठाकरे गटाकडूनही या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला. पण सचिन आहिर यांचा विजय स्पष्टच आहे. सचिन आहिर यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता यादरम्यान सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला.
सचिन आहिर यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. वरळी येथील सचिन आहिर यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त दिसत आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंत त्यांच्या घराबाहेर जसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसाच पोलिस बंदोबस्त आता सचिन आहिर यांच्या घराबाहेर बघायला मिळत आहे. काल वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.
ज्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता सचिन आहिर यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. सचिन आहिर यांना Y + सुरक्षा देखील दिली जाऊ शकते, अशी माहिती पुढे येत आहे. पद ग्रहण केल्यानंतर त्यांना Y + सुरक्षा दिली जाऊ शकते. पोलिसांचे सचिन आहिर यांच्या घराबाहेरील प्रत्येक घडामोडींवर लक्ष आहे. सचिन आहिर यांनी मोठी बंडखोरी केली.