अभिनेत्री आकांक्षा चमोला आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाची बरीच चर्चा सुरू आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर दोघंही वेगळं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये आकांक्षा ही सहभागी झाली असून त्यातच तिने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. मी गौरवशी घटस्फोट घेणार असून वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत, असं तिने या शोमध्ये जाहीररित्या कबूल केलं. मात्र तिच्या या खुलाशामुळे सगळेच हैराण झाले असून गौरवच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. पण याप्रकरणावर अभिनेत गौरव खन्ना अद्याप शांत होता, अखेर त्याने आता या विषयावर बोलत त्याचं मौन सोडलं आहे.
पहिल्यांदाच गौरव झाला स्पॉट
आकांक्षा हिने घटस्फोटाबद्दल सांगितल्यानंतर, गौरव खन्ना हा मंगळवारी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच स्पॉट झाला. तो आपल्या गाडीतून बाहेर आला, पापाराझींसाठी त्याने काही पोझ दिल्या आणि त्यानंतर तो आत निघून गेला. गौरवचा हाँ व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे; घटस्फोटाच्या बातम्यांनंतर तो पहिल्यांदाच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी दिसला. ‘लाफ्टर शेफ्स’ (Laughter Chefs) या शोच्या सेटवर गौरव गेला होता आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी तो बाहेरही आला.
घटस्फोटाच्या बातम्यानंतर काय म्हणाला गौरव ?
गौरवने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल प्रतिक्रिया देत आपलं मौन सोडलं आहे. तो म्हणाला, “परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. आमच्यातील प्रेम तितकंच दृढ आहे आणि एकमेकांना मिळणारा पाठिंबाही अढळ आहे. मी नेहमीच आकांक्षाच्या पाठीशी उभा राहीन; शेवटी ती माझी पत्नी आहे यार. जिथे प्रेम आहे, तिथे मी माघार का घेईन? आकांक्षाला माझ्या खूप शुभेच्छा. मी आयुष्यभर आकांक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि तिला पाठिंबा देईन. ती ‘लॉक अप’ (Lock Upp) जिंकेल, अशी मला आशा आहे.” असं गौरव खन्ना म्हणाला. त्याची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल झाली आहे. दोघांमध्ये सगळं काही आलबेल व्हावं, अशी प्रार्थना अनेक चाहते करत आहेत.
एवढंच नव्हे तर याव्यतिरिक्त, गौरवने आपली पहिली पोस्टही शेअर केली आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये त्याने “Love always” असंही त्याने लिहीलं होतं. गौरव एका शूटिंगसाठी आला होता, त्याने सेटवरील आपल्या लूकचे फोटो शेअर केले. त्याने पांढरा टी-शर्ट, सैलसर जीन्स आणि त्याला साजेसे स्लीव्हलेस जॅकेट असा त्याचा वेष होता. त्याने गॉगल लावला होता आणि आपलं घड्याळही फ्लाँट केलं. या संपूर्ण लूकसह तो अतिशय आकर्षक, हँडसम दिसत होता.
गौरव आकांक्षाचं लग्न
अभिनेता गौरव खन्ना आणि आकांक्षा हे दोघे, 24 नोव्हेंबर 2016 रोजी विवाहबंधनात अडकले. काही काळ या जोडप्याने आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवलं. ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेत ‘अनुज’ची भूमिका साकारून गौरव प्रसिद्धीच्या झोतात आला; या मालिकेने त्याची एक स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासही मदत केली. त्यानंतर, गौरव ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाला आणि विजेता ठरला.