पालघर : राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडका लावला असून शिपायापासून ते तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांना लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक केलीय. त्यामुळे, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एसीबी कारवाईचा धाक प्रशासनातील अधिकाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अद्यापही लाचखोर कर्मचारी, अधिकारी एसीबीच्या गळ्याला लागत आहेत. आता, पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पालघरमधील कारवाईसंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक 13/03 वरील जमिनीवर माती भरणी केली होती. तसेच रूम बांधकामासंदर्भातील पंचनामा न करण्यासाठी आणि संबंधित प्रकरणात सहकार्य करण्याच्या बदल्यात उज्वला पाटील यांनी एकूण 1 लाख 95 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1 लाख 50 हजार रुपये माती भरणीच्या पंचनाम्यासाठी, तर 45 हजार रुपये रुम बांधकामाचा पंचनामा टाळण्यासाठी मागण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून पहिला हप्ता स्वीकारताना उज्वला पाटील यांना पकडले. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवी मुंबईत उपजिल्हाधिकारी अटकेत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 दिवसांपूर्वीच नवी मुंबईत लाचप्रकरणात मोठी कारवाई केली असून सिडकोच्या भूमी व भूमापन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं होतं. रामदास जगताप याला सिडको कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आल्याने सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. नवी मुंबई एसीबीकडून अप्पल जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून या कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.
हेही वाचा
आणखी वाचा