Last Updated:
Tragic Incident: हैदराबादमधील मियापूर येथे 37 वर्षीय महिलेने सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
हैदराबाद: येथील मियापूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 37 वर्षीय महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला हातात घेऊन अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला मात्र सुदैवाने बाळाचा जीव वाचला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
मृत महिलेची ओळख ईशा साहू अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी तिने आपल्या बाळाला हातात घेऊन इमारतीवरून उडी घेतली. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
या भीषण घटनेत सहा महिन्यांचे बाळ मृत्यूच्या दारातून परत आले. पोलिसांच्या माहितीनुसार खाली पडताना बाळ प्रथम एका संरक्षक कुंपणावर (फेन्स) पडले. त्यामुळे पडण्याचा वेग कमी झाला आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले.
घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी तात्काळ बाळाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच बाळ आता धोक्याबाहेर असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.
ईशा साहू मूळची मध्य प्रदेशातील होती. तिच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे. तिची मोठी मुलगी विदी हिचे वय आठ वर्षे असून धाकटी मुलगी वानी ही केवळ सहा महिन्यांची आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर निद्रानाश (इन्सोम्निया), चिंता (Anxiety) आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या नैराश्याच्या (Post-partum Depression) लक्षणांनी त्रस्त होती.
घटना घडली तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य अपार्टमेंटमध्येच उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ईशा आणि तिच्या पतीचे लग्नाला 11 वर्षे झाली होती. दोघेही खासगी क्षेत्रात नोकरी करत होते आणि आपल्या कुटुंबासह या निवासी संकुलात राहत होते.
घटनेची माहिती मिळताच मियापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक चौकशी केली आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात संबंधित महिला मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. मात्र नेमकी परिस्थिती काय होती, याची पडताळणी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांची माहिती, वैद्यकीय नोंदी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुळे कुटुंबीय, शेजारी आणि संपूर्ण परिसर हादरून गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mumbai,Maharashtra
सहा महिन्यांपूर्वी दिला मुलीला जन्म, प्रेगन्सीनंतर काय झाले? चिमुरडीसह टोकाचे पाऊल, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
