समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत


लातूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे (Latur) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील एक निस्वार्थी, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील शेतकरी कुटुंबात 1946 साली जन्मलेल्या शिवाजीराव शिंदे यांनी विद्यार्थी दशेपासूनच समाजवादी विचारांचा स्वीकार केला. प्रा. ना. य. डोळे, बाबा आढाव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, भाई वैद्य यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य केले..

जनता दलाचे राज्य सरचिटणीस म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर पक्षसंघटना मजबूत केली. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या ‘दिल्ली ते कन्याकुमारी’ भारत पदयात्रेचे व्यवस्थापन प्रमुख म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. ‘एक गाव एक पानवठा’ चळवळ, दलित आणि आदिवासी हक्कांसाठीचे आंदोलन आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. १९९५ मध्ये लातूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष असताना जिल्ह्यात पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

राज्यसभेची संधी धुडकावली

राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेवर जाण्याच्या संधी असूनही त्यांनी पदाचा मोह टाळत कार्यकर्त्यांना पुढे केले. त्यामुळे त्यांची ओळख किंगमेकर म्हणूनही होती. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या समाजवादी आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असून विविध राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

हेही वाचा

ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज’कारण’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *