शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीला कोण जबाबदार, बड्या नेत्याने घेतले थेट आदित्य ठाकरे यांचे नाव… – Marathi News | Who is responsible for the split in the Shiv Sena uddhav Thackeray faction? Gulabrao Patil directly names Aaditya Thackeray.


महाराष्ट्रात शिवसेना पक्ष २०२१- २०२२ नंतर पुन्हा एका मोठ्या फुटीला सामोरे जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अभूतपूर्व फूट घडवत कोसळवले होते. त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने लोकसभा निवडणूकीत उध्दव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहेत. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन या मुर्हूतावर पुन्हा सहा खासदारांना एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले असताना आता एका बड्या नेत्याने शिवसेनेच्या विनाशाला केवळ संजय राऊतच नाहीत तर आदित्य ठाकरे देखील तेवढेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेबांनी उभं केलेलं वैभव आणि किल्ला राखण्याचे काम आमचे नेते एकनाथ शिंदे करताहेत आणि चार अक्षरांनी उभी राहिलेली शिवसेना अबाधित ठेवण्याचे काम ते करत आहेत. उद्या फुटलेले खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करतील की नाही याबाबतचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांचा आहे आणि ते जे करतील त्याला सर्वांचे मान्यता असेल असे शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे वक्तव्य केले आहे.

एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष सुरुवातीपासूनच देशात दोन नंबरला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात पक्ष वाढेल.अशा पद्धतीचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष फुटण्याची वेगवेगळी कारण आहेत.आमदार खासदार लोकप्रतिनिधींना पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नाही असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्याबरोबरच पक्ष फुटण्याला आदित्य ठाकरे हे देखील जबाबदार असल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सोन्यासारखी गेलेली माणसं परत येत नाहीत. सोने येते पण माणसं परत येत नाहीत, ज्या माणसांनी रक्ताचं पाणी करून भगवा तेवत ठेवला, ती माणसे गमावली असेही पाटील यावेळी म्हणाले.

यावर बोलण्याइतपत मी मोठा नाहीए…

शिवसेना तशीच राहील आणि त्यासाठीच एकनाथराव शिंदे साहेबांचा जन्म झाला आहे, असं मला वाटतं. कोणाला या शिवसेनेत या असे सांगायची गरज नाही आपोआप डब्याला डब्बा जुळतो आहे आणि इंजिन पुढे चालत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्धव साहेब पण येतील का असे विचारले असता ते म्हणाले की यावर बोलण्याइतपत मी  मोठा नाहीए…कारण माझा माल (संजय राऊत ) तुम्हाला माहिती आहे अशी कोपरखळी गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *