मोठी बातमी! दोन महिन्यात सहावा धक्का, या नेत्याची आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी – Marathi News | Aiadmk mla mr vijayabaskar resigns quits party sixth mla in two months


गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली आहे. अशातच आता तमिळनाडूमध्ये AIADMK पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात माजी मंत्री एम.आर. विजयभास्कर यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. विजयभास्कर हे AIADMK ची साथ सोडणारे सहावे आमदार ठरले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विजयभास्कर यांचा पक्षाला रामराम

समोर आलेल्या माहितीनुसार, करूर मतदारसंघाचे माजी आमदार असलेले विजयभास्कर लवकरच सत्ताधारी TVK पक्षात प्रवेश करू शकतात. त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून काम केलेले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विजयभास्कर यांनी AIADMK नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यांनी AIADMK आणि DMK यांच्यातील कथित युतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी लिहिले की, ‘जयललिता यांनी ज्याला दुष्ट शक्ती म्हटले, त्या DMK सोबत AIADMK हातमिळवणी कशी करू शकते?’

पलानीस्वामींवरही टीका

AIADMK प्रमुख एडप्पडी के. पलानीस्वामी यांच्यावर निशाणा साधत विजयभास्कर म्हणाले, ‘आमचा विरोध तुमच्या नेतृत्वाला नव्हता, तर तुम्ही घेतलेल्या निर्णयाला होता. तुम्हाला पक्षाचा कायमस्वरूपी महासचिव बनवण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना आणि आमच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे आज संपूर्ण पक्ष संकटात सापडला आहे. आज मी अश्रूंनी आणि मनात खोल दुःख घेऊन या पक्षाचा निरोप घेत आहे.’

करूर मतदारसंघातून आमदार

2021 च्या विधानसभा निवडणुकीत करूर मतदारसंघातून विजयभास्कर यांचा DMK चे व्ही. सेंथिल बालाजी यांच्याकडून निसटता पराभव झाला होता. मात्र एप्रिल 2026 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन करत TVK चे उमेदवार व्ही. पी. मथियलगन यांचा 1,821 मतांनी पराभव केला.

AIADMK पक्षाला गळती

AIADMK मधील अंतर्गत कलहामुळे अनेक नेते पक्ष सोडत आहेत. विजयभास्कर यांच्याआधी माजी आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनीही आमदारपदाचा राजीनामा देत पक्ष सोडला असून, तेही TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मरगथम कुमारवेल, पी. सत्यभामा, एस. जयकुमार आणि इसाक्की सुबैया या प्रमुख नेत्यांनी AIADMK ला रामराम ठोकत TVK मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाची चिंता वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *