Last Updated:
उलवे सेक्टर-19 मधील ला रेसिडेन्सी या लॉजमध्ये एक महिला अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली.
नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवे पोलिसांनी आपल्या हद्दीतील एका लॉजवर छापा टाकून दोन अल्पवयीन सख्या बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 आणि 14 वर्षांच्या दोन पीडित सख्या बहिणींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध पॉक्सो, पिटा आणि नवीन भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उलवे सेक्टर-19 मधील ला रेसिडेन्सी या लॉजमध्ये एक महिला अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती उलवे पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाणे व त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून या महिला दलालाला संपर्क साधला होता.
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आरोपी महिलेने बोगस गिऱ्हाईकासाठी वेश्यागमनासाठी रोख रक्कम स्विकारल्यानंतर पोलिसांनी लॉजमध्ये छापा टाकला. या छाफ्यात दोन्ही अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेतले जात असल्याचे उघडकीस आले. आरोपी दलाल महिलेने या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही स्वत:च्या उपजीविकेसाठी त्यांना वेश्याव्यवसायात ढकलल्याने उलवे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
33 वर्षीय महिलेला अटक
या कारवाईत सख्या बहिणी असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी दिली.
Mumbai,Maharashtra
मुली आहेत का? ग्राहक बनून आलेल्या पोलिसांनी केला पर्दाफाश, वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेचं मोठं कांड उघड
