Last Updated:
यंदाच्या पावसाळ्यात अजून अडीच ते तीन महिने शिल्लक असताना संरक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांच्या पावसात घाटातील गॅबियन वॉलची अवस्था चिंताजनक झाली असून, येत्या मुसळधार पावसात ही संरक्षण भिंत टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
परशुराम घाटातील डोंगरकपातीनंतर घाटाच्या सुरक्षिततेसाठी रॉक बोल्टिंग आणि घाटाच्या खालच्या बाजूला गॅबियन वॉल उभारण्याची शिफारस केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने केली होती. त्यानुसार संरक्षणासाठी गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र, पावसाळा सुरू होऊन अवघे पंधरा ते वीस दिवस होत असतानाच या गॅबियन वॉलखालील भराव वाहून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच, थराथराने बांधलेल्या स्टील केबल्सनाही तडे जाऊ लागल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात अजून अडीच ते तीन महिने शिल्लक असताना संरक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांना भीती
परशुराम घाटाच्या कामावेळी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या डोंगरकपातीचा परिणाम आता घाटाखालील पेढे गावातील कुंभारवाडी परिसरावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात गॅबियन वॉल कोसळली किंवा वाहून गेली, तर मोठ्या प्रमाणावर माती, दगड आणि पाण्याचा लोट थेट कुंभारवाडीकडे येण्याचा धोका असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, घाटात दगड, माती आणि दरडी रस्त्यावर येण्याच्या घटनाही सुरूच असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परशुराम घाटात सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली गॅबियन वॉलच आता धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. पावसाळ्याचा मोठा कालावधी अद्याप बाकी असताना प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा “कोकणची वाट आणि धोक्याचा घाट” अशीच परशुराम घाटाची ओळख कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
Ratnagiri,Maharashtra
