‘फ्रेशर्स’ फेम शुभंकर तावडेचं 10 वर्षांनंतर कमबॅक; एकाच मालिकेत दोन देखणे हिरो – Marathi News | Shubhankar Tawde comeback after 10 years to play lead roles with aashay kulkarni in Paathrakhin


शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णीImage Credit source: Instagram

येत्या 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘पाठराखीण’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक गुंतागुंत उलगडणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांची झलक पाहायला मिळाली होती. आता दुसऱ्या प्रोमोमधून अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी यांच्या भूमिकांचा खुलासा होणार आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता शुभंकर तावडे आता ‘पाठराखीण’च्या निमित्ताने दहा वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे.

‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर हा आलोक सूर्यवंशी ही भूमिका साकारणार आहे. दिसायला देखणा असलेला आलोक स्वभावाने मात्र अत्यंत गुंतागुंतीचा आणि विक्षिप्त आहे. मोठ्या आवाजाची भीती, मनाविरुद्ध गोष्टी झाल्यावर अनावर होणारा राग आणि स्वतःलाही इजा करण्याइतका टोकाचा स्वभाव… आलोकच्या या वागण्यामागे नेमकं काय कारण आहे हे मालिकेतून उलगडेल. पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी शुभंकर प्रचंड उत्सुक आहे. “टीव्ही या माध्यमाविषयी मला प्रचंड आदर आहे. माझ्या अभिनयाची सुरुवातच टेलिव्हिजनने झाली. मध्यंतरीच्या काळात अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त असल्यामुळे मालिकेत काम करणं शक्य झालं नाही. पण पाठराखीण मधल्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि ऐकता क्षणीच मला ती भावली. सहसा अश्या पद्धतीची भूमिका करायाला कुणी धजावत नाही. आलोक हा टिपिकल हिरो नाहीय. हळूहळू हे पात्र प्रेक्षकांना उलगडेल,” अशी भावना शुभंकरने व्यक्त केली.

आलोकच्या लहान भावाची म्हणजेच आरव सूर्यवंशीची भूमिका आशय कुलकर्णी साकारणार आहे. छोट्या ब्रेकनंतर आशय पुन्हा एकदा मालिकाविश्वात परतत असून त्याच्या पुनरागमनाची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, “आरव हा परदेशातून शिक्षण घेऊन आलेला, समजूतदार आणि घरातल्यांचा लाडका असलेला मुलगा. आपल्या मोठ्या भावावर म्हणजेच आलोकवर तो जीवापाड प्रेम करतो. शांत स्वभाव आणि समोरच्याचं म्हणणं समजून घेण्याची त्याची वृत्ती ही त्याची खासियत आहे. शुभंकर माझा खूप चांगला मित्र आहे. एकत्र काम करण्याचा योग कधी आला नव्हता. या मालिकेच्या निमित्ताने ती संधी चालून आली. मला खात्री आहे या मालिकेला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *