प्रवाशांना मोठा दिलासा, आता सुरक्षितपणे ओलांडा रस्ता, पुण्यातील वाकड चौकात 60 मीटरचा पादचारी पूल | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले असून, मेट्रो प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.

News18
News18

पुणे : पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रो लाइन 3 अंतर्गत वाकड मेट्रो स्थानकावर 60 मीटर लांबीचा पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारला आहे. मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या वाकड चौकात सोमवारी (29 जून) पहाटे हा पूल यशस्वीपणे बसविण्यात आला. या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले असून, मेट्रो प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड चौक हा पश्चिम पुण्यातील अत्यंत गजबजलेला वाहतूक केंद्रबिंदू आहे. दररोज हजारो नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच राज्यातील विविध भागांतून ये-जा करणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. वेगवान वाहतुकीमुळे रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत होते. नव्याने उभारलेल्या पादचारी पुलामुळे नागरिकांना सुरक्षित पर्याय मिळणार असून, पादचारी अपघातांचा धोका कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

वाकड चौकातील मोठी वाहतूक लक्षात घेता पुलाची उभारणी हे अभियंत्यांसमोर मोठे तांत्रिक आव्हान होते. वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी संपूर्ण काम रात्रीच्या वेळेत करण्यात आले. शनिवारी रात्रीपासून कामाला सुरुवात करण्यात आली आणि नागरी अभियांत्रिकी पथकाने सलग दोन रात्री अखंड काम करून सोमवारी सकाळपर्यंत पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाशी यशस्वीपणे जोडली.

हा पूल केवळ मेट्रो प्रवाशांसाठीच नव्हे, तर मुंबई, बेंगळुरू, नागपूर, चेन्नईसह विविध शहरांकडे जाणाऱ्या शासकीय व खासगी बस, शेअर्ड कॅब आणि इतर वाहनांच्या प्रवाशांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. वाकड चौक हा महत्त्वाचा पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट असल्याने येथे मेट्रो, बस आणि इतर वाहतूक साधनांचा अधिक प्रभावी समन्वय साधला जाणार आहे.

दरम्यान, वाकड मेट्रो स्थानकाची बहुतांश नागरी कामे पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यातील फिनिशिंगची कामे सुरू आहेत. स्थानकावर दिशादर्शक फलकही बसविण्यात आले आहेत. 23.3 किलोमीटर लांबीच्या पुणे मेट्रो लाइन 3 मार्गावरील हे सर्वाधिक महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक मानले जात असून, शहर बस सेवा, फीडर सेवा आणि खासगी वाहनांशी त्याची प्रभावी जोडणी करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रो लाइन 3 ने संपूर्ण 23 किलोमीटर उन्नत मार्गावर एंड-टू-एंड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, आता वैधानिक आणि नियामक मंजुरीनंतर मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मान ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या 13.3 किलोमीटर मार्गावरील 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येतील. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास सध्याच्या सुमारे दीड तासांऐवजी अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण होणार असून, आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/

प्रवाशांना मोठा दिलासा, आता सुरक्षितपणे ओलांडा रस्ता, पुण्यातील वाकड चौकात 60 मीटरचा पादचारी पूल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *