पुणे : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनाही सातत्याने समोर आल्या आहेत. त्यातच, आता मंचरजवळील (Pune) निघोटवाडी फाटा येथे एका तरुणीला डिंभे धरणाच्या (Dam) उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर आरोपी तरुणाला स्थानिकांनी वाचविले असले तरी तरुणी मात्र पाण्यात वाहून गेली होती. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आरोपीला मंचर पोलिसांनी अटक केली आहे.
माळशिरसजवळील तांदुळवाडी येथे विहिरीत पिकअप पडून झालेल्या दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे अपघाताच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत, तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एका युवतीला धरणाच्या कालव्यात ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी रमेश बबन कडाळे या तरुणाने स्वप्नाली भांगरे या तरुणीसोबत झटापट करून तिला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचविले होते. मात्र, स्वप्नाली ही तरुणी पाण्यात वाहून गेली होती.
18 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तब्बल 18 तासांनंतर सोमवारी स्वप्नाली भांगरे चा मृतदेह सापडला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबन कडाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या