Sunil Lodhi Success Story : “अंध असणे हा काही गुन्हा नाही, पण गावातील लोक माझ्याकडे पाहतही नव्हते. सकाळी माझं तोंड दिसलं तरी लोक मार्ग बदलायचे,” हे दुःखाचे शब्द आहेत 25 वर्षीय गायक सुनील लोधी याचे. ज्या मुलाला जन्मांध असल्यामुळे संपूर्ण गावाने अनेक वर्षे अशुभ मानले आणि वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली, त्याच सुनील लोधीने आपल्या अलौकिक आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटातील “मैंने तेरे ही भरोसे हनुमान” हे गाणे गाऊन सुनीलने आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
Sunil Lodhi Instagram Reel To Bollywood : इन्स्टाग्राम रीलने बदलले नशीब
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील बुंदेलखंड भागातील एका लहानशा गावातील हा मुलगा. 2019 मध्ये सुनीलचे काका रोहित साहू यांनी बुंदेलवादी लोककला जगासमोर आणण्यासाठी ‘बुंदेली दुनिया’ नावाचे इन्स्टाग्राम पेज सुरू केले. जेव्हा रोहित यांनी पहिल्यांदा सुनीलला तंबुरा वाजवून गाताना ऐकले, तेव्हा त्यांना त्याच्या आवाजात एक दैवी देणगी जाणवली.
सुरुवातीला अनेक महिने व्ह्यूज मिळत नव्हते आणि गावकरी रोहित यांची चेष्टा करायचे. मात्र, 2023 मध्ये “दूल्हा बनकर आ गव ठेला” (9 लाख व्ह्यूज) आणि 9 महिन्यांपूर्वी “ओ मेरे संकट के कटैया हनुमान” (3.3 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज) या गाण्यांनी सुनीलला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.
Sunil Lodhi Versova Beach Video : वर्सोवा बीच ते साईबाबा स्टुडिओ
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोहित आणि सुनील मुंबईत एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आले होते. त्यावेळी वर्सोवा बीचवर रोहित यांनी सुनीलचा तंबुऱ्यासोबत एक व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर टाकला. ‘हनुमान अंश’ चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी ही रील पाहिली आणि त्यांनी सुनीलला थेट ऑडिशनसाठी बोलावले.
सुनीलने तंबूरा हातात घेऊन “मैंने तेरे ही भरोसे हनुमान, सागर में नैया डार दई” या गाण्याच्या अवघ्या चार ओळी गायल्या आणि स्टुडिओतील संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले. दिग्दर्शकाने त्याच क्षणी घोषित केले, “हाच माझ्या चित्रपटाचा खरा आवाज आहे!”
Hanuman Ansh Singer Story : काकाच बनले अंध पुतण्याचे डोळे
सुनील जन्मांध असल्याने त्याला औपचारिक शिक्षण घेता आले नाही. त्याचे कुटुंब पशुपालन आणि शेतीवर उदरनिर्वाह करते. लहानपणापासूनच चौपाल आणि भजन मंडळींकडून ऐकून त्याने गाणे शिकले. एकदा एका ज्येष्ठ गायकाने सुनीलची लय पाहून आपला तंबूरा त्याला भेट दिला. जेव्हा नवीन गाण्याचे बोल शिकायचे असतात, तेव्हा त्याचे काका रोहित त्याचे डोळे बनतात. ते प्रत्येक ओळ 20-20 वेळा उच्चारून सुनीलच्या गळ्यात उतरवतात.
Sunil Lodhi Success Story : “मी भिकारी नाही, रियाझ करत होतो”
काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये गातानाचा सुनीलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यावर तो भीक मागत असल्याचा दावा केला गेला. यावर सुनीलने सडेतोड उत्तर दिले, “मी ट्रेनमध्ये भीक मागत नव्हतो, तर माझा रियाझ करत होतो. देवाची भक्ती आणि गाणे ही माझी पूजा आणि माझा स्वाभिमान आहे. कलाकार पाहू शकत नाही म्हणजे तो भिकारी होत नाही.”
ज्या गावात एकेकाळी सुनीलचे तोंड पाहणे अशुभ मानले जायचे, आज त्याच गावातील लोक त्याच्या स्वागतासाठी हातात हार-तुरे घेऊन उभे असतात.
ही बातमी वाचा: