Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


Sher E Punjab T20 League Update : पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) द्वारे एका नव्या टी-20 लीगची घोषणा करण्यात आली असून, ‘शेर-ए-पंजाब टी-20 लीग’ असे या स्पर्धेचे नाव आहे. या लीगचे आयोजन 30 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक स्टार क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यासह अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, गुरनूर ब्रार, प्रभसिमरन सिंग आणि रमणदीप सिंग यांसारखे प्रमुख खेळाडू महाराजा यादविंदर सिंग पीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरतील.

ही PCA कडून आयोजित केली जाणारी पहिली फ्रँचायझी-आधारित टी-20 लीग आहे. पीसीए अध्यक्ष अमरजीत सिंग मेहता, सचिव गुरमीत सिंग मीत हायर, शुभमन गिल आणि अर्शदीप सिंग यांच्या उपस्थितीत या लीगचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात स्पर्धेच्या अधिकृत लोगोचेही अनावरण करण्यात आले.

6 संघ आणि 27 सामने

‘शेर-ए-पंजाब टी-20 लीग’मध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार असून त्यांच्यात 27 सामने खेळवले जातील. दररोज 2 सामने आयोजित केले जातील, ज्यातील पहिला सामना दुपारी आणि दुसरा सामना फ्लडलाइट्सखाली खेळवला जाईल. ही स्पर्धा राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये होईल, म्हणजेच प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध खेळेल. प्रत्येक फ्रँचायझीमध्ये एक मार्की खेळाडू आणि किमान दोन आयकॉन खेळाडू असतील. यामुळे आंतरराष्ट्रीय स्टार्स, देशांतर्गत खेळाडू आणि पंजाबमधील उगवत्या तरुण नवोदित खेळाडूंचा उत्तम मेळ पाहायला मिळेल.

शुभमन गिलची प्रतिक्रिया 

लीगच्या लॉन्चिंग प्रसंगी बोलताना शुभमन गिल म्हणाला, “शेर-ए-पंजाब टी-20 लीग हे तरुण खेळाडूंसाठी त्यांची प्रतिभा दाखवण्याचे आणि पंजाब तसेच भारतासाठी खेळण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. पंजाबने देशाला नेहमीच उत्कृष्ट क्रिकेटपटू दिले आहेत आणि मला विश्वास आहे की ही लीग भविष्यात अनेक नवीन टॅलेंट समोर आणेल. मी या उपक्रमासाठी आणि लीगच्या यशासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा देतो.”

9 ऑगस्टला खेळाडूंचा लिलाव

या कार्यक्रमात खेळाडूंच्या लिलावाची तारीखही जाहीर करण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी खेळाडूंवर बोली लावली जाईल. यामध्ये अमृतसर, फाजिल्का, जालंधर, लुधियाना, मोहाली आणि बठिंडा या 6 शहरांच्या फ्रँचायझी आपापले संघ तयार करतील. प्रत्येक फ्रँचायझीसाठी 45 लाख रुपयांची सॅलरी पर्स निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा –

Auqib Nabi IND vs SL 1st Test : भारतीय संघात मोठा बदल!’जम्मू-काश्मीर एक्स्प्रेस’ची टीम इंडियात धडाकेबाज एन्ट्री, कोण आहे आकिब नबी?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *