IND vs WI ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु असून दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने कमाल केली. दुसऱ्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. यानंतर रोहितच्या फॉर्मचे सर्वत्र कौतुक झाले. रोहितच्या फॉर्मवरुन त्याला अनेकदा डिवचण्यात आले होते. यामुळे आता त्याने शतक झळकावल्यानंतर तो २०२७ वनडे विश्वचषकात खेळेल ही शक्यता नाकारता येत नाही. आता रोहितनेही यावर भाष्य केले आहे.
गेल्या काही काळापासून रोहितबद्दल विविध अफवा पसरत आहेत. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्या निवृत्तीच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, लॉर्ड्सवर शतक झळकावून रोहितने या अफवांना पूर्णविराम दिला. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आणि आता तो विश्वचषकाविषयी बोलला आहे.
रोहित म्हणाला, “मी एवढंच सांगेन की २०२७ चा आगामी एकदिवसीय विश्वचषक जिंकणं खूपच अद्भुत असेल. मी सध्या त्याबद्दल फारसा विचार करत नाहीये. भारतासाठी विश्वचषक जिंकणं ही एक विशेष भावना आहे. मी टी-२० फॉरमॅटमध्ये दोनदा याचा अनुभव घेतला आहे. २००७ मध्ये, मी फक्त २० वर्षांचा होतो. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि माझ्या कारकिर्दीच्या एका वर्षाच्या आत ती जिंकणं ही एक मोठी गोष्ट होती. त्यानंतर, आम्ही २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि मग ११ वर्षे अशी होती जेव्हा आम्ही कोणतेही आयसीसी विजेतेपद जिंकू शकलो नाही.”
रोहित म्हणाला की “जेव्हा आम्ही २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकलो, तेव्हा मला जाणवलं की ते किती महत्त्वाचं होतं. ती भावना आजही माझ्या मनात आहे. विश्वचषक जिंकल्यावर कसं वाटतं हे मला माहीत आहे आणि मला ती भावना पुन्हा अनुभवायची आहे. आम्ही जी मजा केली ती शब्दातीत आहे. मला फक्त २०२७ च्या विश्वचषकापर्यंत स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे. मी कठोर परिश्रम करत आहे आणि प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करू इच्छितो. माझे ध्येय आता माझ्यासमोर आहे आणि मला ते चांगल्या प्रकारे साध्य करायचे आहे. आत्ता पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरचा विचार करणं मी सोडून दिलाय मला माझ्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करायचे आहे, प्रत्येक आव्हानावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.”