Ramayana: आदिनाथ कोठारेचा चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत; हॉलिवूडच्या बड्या चित्रपटांना देणार टक्कर – Marathi News | Adinath kothare ramayana enters Oscars Visual Effects Top 20 list ranbir kapoor yash


रामायण, आदिनाथ कोठारेImage Credit source: Instagram

Ramayana: अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ सुपरस्टार यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत मोठी मजल मारली आहे. 99 व्या अकादमी पुरस्कारांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) विभागातील टॉप 20 चित्रपटांच्या यादीत ‘रामायण’चा समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या यादीत अनेक बड्या हॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे. भारतीय पौराणिक कथा जागतिक स्तरावर भव्य स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न ‘रामायण’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्सची आधीपासूनच चर्चा होती. आता ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळाल्याच्या वृत्तामुळे चित्रपटाच्या टीमसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

‘रामायण’ला ऑस्करमध्ये मिळाली संधी

‘व्हरायटी’च्या वृत्तानुसार, 99 व्या अकादमी पुरस्कारांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स विभागात पुढील मतदानाच्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या 20 चित्रपटांमध्ये ‘रामायण’चा समावेश आहे. अकादमीच्या व्हिज्युअल इफेक्ट्स शाखेने पुढील फेरीत पोहोचलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, अकादमीकडून ही टॉप 20 यादी अधिकृतपणे सार्वजनिक केली जात नाही. त्यामुळे या वृत्ताला ‘व्हरायटी’ने संबंधित चित्रपटांच्या टीमकडून माहिती मिळवून दुजोरा दिला आहे. याआधी ‘रामायण’ने 32 व्या क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्सच्या दोन श्रेणींमध्ये शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवलं होतं. आता ऑस्करच्या शर्यतीतही चित्रपटाने मजल मारल्यामुळे निर्माते नमित मल्होत्रा आणि संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बातमी आहे.

हॉलिवूडच्या बड्या चित्रपटांशी होणार स्पर्धा

‘रामायण’ला ऑस्करच्या शर्यतीत अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे. या यादीत ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’, डेनिस विलेन्यूव्ह यांचा ‘ड्यून: पार्ट थ्री’, स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा ‘डिस्क्लोजर डे’, ‘अ‍ॅव्हेंजर्स: डूम्सडे’, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’, ‘सुपरगर्ल’ आणि ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘ड्यून’ आणि ‘ड्यून: पार्ट टू’ या दोन्ही चित्रपटांनी याआधी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. तर ख्रिस्तोफर नोलन यांनी ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ आणि ‘टेनेट’ या चित्रपटांसाठी या श्रेणीत पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे ‘रामायण’समोरचं आव्हान मोठं असणार आहे.

पुढील टप्प्यात काय होणार?

ऑस्करच्या व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीतील टॉप 20 चित्रपटांमधून पुढील मतदान प्रक्रियेद्वारे 10 चित्रपटांची शॉर्टलिस्ट तयार केली जाणार आहे. ही शॉर्टलिस्ट 15 डिसेंबर 2026 रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स टीम्सना विशेष सादरीकरणाची संधी मिळेल. अंतिम नामांकनासाठी मतदान 11 ते 15 जानेवारी 2027 दरम्यान होणार असून 21 जानेवारीला नामांकन जाहीर होतील. 99 वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी पार पडणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *