Parbhani Crime News: सरकारी कार्यालयात काम करून घेण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून लाच मागून ती स्वीकारताना आणि त्या संदर्भातील कारवाईही आपण पाहिले असेल, पण परभणीत चक्क मतदार यादीत नाव टाकण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या सहशिक्षकाच्या मुसक्या एसीबीने (ACB) आवळल्या आहेत. रामेश्वर विलास काळे असे या सह शिक्षकाचे नाव असून ते परभणी (Parbhani) शहरातील प्रेरणा विद्यानिकेतन शाळेत कार्यरत आहे.
Parbhani Crime News: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 2500 रुपयांची लाच; एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं
परभणी विधानसभा मतदारसंघात BLO म्हणून काम करत असलेले रामेश्वर काळे हे SIR फॉर्म अंतर्गत 2002 च्या मतदार यादीत नाव नसल्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एका कुटुंबाला 2500 रुपयांची लाच मागितली. मात्र सदर कुटुंबाने बीएलओने अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर परभणी शहरातील बालाजी भोजनालय स्टेशन रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी रामेश्वर काळे याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडलं.
दरम्यान, या प्रकरणी परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच चर्चा रंगू लागली असून आता याच कामासाठी लाच मागायची बाकी होते, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहे.
Mumbai Crime News : मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. घरातील किचनमधून क्लाऊड किचन व्यवसाय सुरू करण्यासाठी गटार लाईन आणि चेंबर दुरुस्तीसाठी महापालिकेकडे परवानगीसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. परवानगी मिळवून देण्यासाठी सुरुवातीला 1 लाख 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तर घरगुती जेवणाच्या व्यवसायासाठी किचनची गटार लाईन आणि चेंबर दुरुस्तीसाठी आवश्यक परवानगी मिळवून देण्यासाठी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
Crime : गटार लाईन आणि चेंबर दुरुस्तीसाठी महापालिकेकडे परवानगीसाठी लाच
मिळालेल्या माहितीनुसार, राधेश्याम विजयप्रसाद जयस्वाल, वय 39 वर्षे, हे ‘ए’ वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे असिस्टंट इंजिनिअर पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याची माहिती आहे. तक्रारदार महिलेने आपल्या घरातील किचनमधून क्लाऊड किचन व्यवसाय सुरू करण्यासाठी गटार लाईन आणि चेंबर दुरुस्तीसाठी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळवून देण्यासाठी जयस्वाल यांनी सुरुवातीला 1 लाख 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने 15 जून 2026 रोजी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत जयस्वाल यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं.
अशातच, काल (19 ऑगस्ट रोजी) एसीबीने सापळा रचून ‘ए’ वॉर्ड कार्यालयात जयस्वाल यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, आरोपीच्या अंगझडतीत मोबाईलसह तब्बल 7 लाख 3 हजार 600 रुपये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती एसीबीने दिली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या