मागच्या आठड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झालं. चार वर्षात दुसऱ्यांदा जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फुटले. 2022 साली 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून भाजप सोबत सरकार बनवलेलं. आता निवडून आलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी हे खासदार निवडून आले होते. नजीक कुठल्या निवडणुकाही नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका याच्या निवडणुकाही पार पडल्या होत्या. त्यामुळे खासदार फुटण्यासाठी सुद्धा काही कारण नव्हतं, तरीही ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. त्यांनी वेगळा गट स्थापन केला. यात फुटलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा कोणाची झाली, तर ते ओमराजे निंबाळकर आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडणं हा उद्धव ठाकरेंपासून सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी सुद्धा मोठा झटका आहे. ओमराजे असं वागतील असं वाटलं नव्हतं, असं सुद्धा अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवलं. कारण ओमराजे निंबाळकर हा संवेदनशील नेता म्हणून ओळखला जातो. मागच्यावर्षी मराठवाड्यात पूर आला, तेव्हा सर्वसामान्यांसाठी पुराच्या पाण्यात उतरलेला हा नेता. चारवर्षांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झालं. उद्धव ठाकरे अडचणीत असतानाही ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहिले. पण आता मात्र ओमराजे यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला.
मैत्री सर्व जिल्ह्यात सर्वश्रुत आहे
त्यांच्या या निर्णयाला राजकीय पदर आहेत. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाची होणारी पिछेहाट, विकासनिधीची कमतरता या दोन मुद्यांमुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांचे जिवलग मित्र कैलास पाटील मात्र आजही ठाकरे गटासोबतच आहेत. कैलास पाटील धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना तिकीट देऊन निवडून आणण्यात ओमराजे निंबाळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची मैत्री सर्व जिल्ह्यात सर्वश्रुत आहे.
कैलास पाटील काय म्हणाले?
उद्धव ठाकरे सध्या फुटलेल्या खासदारांच्या दौऱ्यावर आहेत. ते धाराशिवला येण्याआधी कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी ते काही गोष्टी बोलले. “धाराशिव जिल्हा कुठल्याही एका व्यक्तीच्या मागे नाही. मी कुठेही जाणार नाही. धाराशिव जिल्हा हा वंदनीय हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे. मातोश्रीशी प्रामाणिक असलेला जिल्हा आहे. शिवसैनिकांच्या आणि मातोश्रीच्या आशिर्वादाने निवडून येतात हे सिद्ध करण्यासाठी हा मेळावा यशस्वी करणं आपली जबाबदारी आहे” असं कैलास पाटील म्हणाले.