महाराष्ट्राच्या राजकारणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरु आहे. त्याला कारण आहे, उद्धव ठाकरे गटातील फूट. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. पण अजून त्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. काल उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी करुन बैठक बोलवली होती. त्या बैठकीला सहाखासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरे गटात फूट पडल्याचं स्पष्ट झालं. या सहाखासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरी ठाकरे सैनिकांच्या मनाला जास्त लागली आहे. ओमराजे निंबाळकर यांना ठाकरेंनी सर्वकाही दिलं. त्यांचं राजकीय करिअर उभं केलं. पण तेच ओमराजे बंडखोर बनले. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक दुखावला गेला आहे.
सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांच्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे शिवसैनिकांकडून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्यांची गाडी फोडणार आणि त्याला फटके देणार अशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी धमकी दिली आहे. सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं.
खासदारांचे दशक्रिया विधी
शहरातील गणपती घाटावर खासदारांचे दशक्रिया विधी करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा गट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्याची गाडी फोडणार आणि त्याला फटके देणार असा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला.
ओमराजे गद्दार निघाला
“एकनाथ शिंदे यांना मुलं होत नाहीत म्हणून त्यांनी ठाकरेंची मुलं पळवली आहेत. आज खासदार पळाले असले तरी आम्ही पुन्हा खासदार निवडून आणू. ओमराजेसाठी आम्ही घाम गाळला आहे. मात्र ओमराजे गद्दार निघाला. या गद्दारीची किंमत त्याला चुकवावी लागेल” असा प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला. ओमराजे निंबाळकर कुठे आहेत हे कोणाला माहित नाहीय, ते पुण्यात असल्याचं बोललं जातय.