Mumbai Crime Khar: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. मुंबईत मॉडेलिंग (Modeling) क्षेत्रात काम करण्यासाठी आलेल्या तरुणींना भुलवून त्यांना याठिकाणी देहविक्रय (Prostitution racket) करण्यासाठी प्रवृत्त केले जायचे. खार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून या रॅकेटचा भांडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी अपूर्वा भुजंग राव (वय 26 रा. ओशिवरा) या पीडित महिलेची सुटका केली आहे. (Crime news)
प्राथमिक माहितीनुसार, खारच्या एस.व्ही. रोडवरील रामी गेस्टलाईन या हॉटेलमधून या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटची सूत्रे हलवली जात होती. मॉडेलिंग क्षेत्रातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, 1956 मधील कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा केला आहे.
पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला तेव्हा एका मॉडेल तरुणीची सुटका केली. पोलिसांनी कारवाईत 22 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. तसेच 1.50 लाखांचा आयफोन 17 प्रो मॅक्स आणि एक लाखांचा iPhone 16 Pro Max असा एकूण 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, ड्युरेक्स कंपनीच्या निरोधाची (Condoms) तीन पाकिटे आणि खेळातील बनावट नोटाही पोलिसांनी हस्तगत गेल्या. या प्रकरणाचा पुढील तपास खार पोलीस करत आहेत. आरोपींच्या चौकशीतून नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणींचा वापर केल्या जाणाऱ्या या सेक्स रॅकेटची पाळेमुळे आणखी कुठपर्यंत पसरली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून कोणत्या नव्या गोष्टी समोर येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Crime news: विलेपार्ले फिजिओथेरपिस्ट बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा रद्द
2016 मधील 24 वर्षीय फिजिओथेरपिस्टच्या बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी देबाशिष धारा याची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आरोपीला “मुक्त करण्याचे” आदेश दिले. 2019 मध्ये सत्र न्यायालयाने बलात्कार, हत्या आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपांत दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” असल्याचे सत्र न्यायालयाने नमूद केले होते. डिसेंबर 2016 मध्ये पीडितेच्या खोलीतून धूर येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी तिच्या पालकांना दिली होती. खोली बाहेरून बंद होती. पीडिता जमिनीवर मृतावस्थेत आढळली. तिच्या गळ्याभोवती जीन्स गुंडाळलेली होती. शवविच्छेदनात बलात्कार व गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी आरोपीला घटनेनंतर सुमारे दोन महिन्यांनी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती. बचाव पक्षाचा दावा होता की, आरोपीला केवळ संशयावरून गोवण्यात आले. पीडितेच्या वडिलांचे वकील सिद्धार्थ जगुष्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार असल्याचे सांगितले.
आणखी वाचा