धाराशिव : राज्यात नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरवरुन सुरू झालेला राजकीय गोंधळ अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नवा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar) यांचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला. त्याचवेळी, आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला. तसेच धाराशिवमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी रोहित पवारांनी आंदोलनाची तलवार उपसली आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंड करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला निधी मिळत नसल्याने, मतदारसंघाचा विकास करायचा असल्याने शिंदेंच्या सोबत गेल्याचा दावा या सर्व खासदारांनी केला. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हेदेखील आहेत. त्यांच्यावर आता रोहित पवार यांनी जोरदार टीका केली.
Rohit Pawar On Omraje Nimbalkar : 95 कोटी घेतल्याचा रोहित पवारांचा दावा
शिंदेकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. त्याचा रोख हा ओमराजे निंबाळकरांकडे असल्याची चर्चा आहे. रोहित पवार म्हणाले की, “खासदार फुटीसाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामध्ये 30 ते 90 कोटी पर्यंत कॅशमध्ये पैसे दिले आहेत. तसेच दरवर्षाला अडीशे कोटीचा विकास निधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.”
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओमराजे यांनी आमच्या सोबत आघाडी केली नाही, वर्षभरापूर्वीच शिंदेकडे प्रवेश करायचं ठरलं होतं का? असा प्रश्न यावेळी रोहित पवारांनी केला. त्याचवेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात रोहित पवारांनी दंड थोपटले.
मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखे कर असं धाराशिव मध्ये दोन कुटुंबातच राजकारण सुरू आहे. येणाऱ्या काळात सर्वच पक्षांनी सर्वसामान्य घरातला चेहरा देण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले.
ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर सुरू झालेल्या ऑपरेशन तुतारीची चर्चा रोहित पवारांनी फेटाळली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एकही खासदार फुटणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला.
ही बातमी वाचा:
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?