Akshaye Khanna Mahakali : ‘रहमान डकैत’नंतर अक्षय खन्ना बनला ‘शुक्राचार्य’; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट


Akshaye Khanna New Movie Mahakali : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटात ‘रहमान डकैत’ची भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडल्यानंतर, आता अक्षय खन्ना एका मोठ्या पौराणिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या (Prashanth Varma Cinematic Universe) ‘महाकाली’ (Mahakali) या चित्रपटात तो असुरांचे गुरु ‘शुक्राचार्य’ यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाची पहिली झलक 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्राचार्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची पौराणिक कथा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चित्रपटात अक्षय खन्नासोबत भूमी शेट्टी आणि रोहित सराफ हे दिसणार आहेत. 

केवळ ‘असुरांचे गुरु’ एवढीच ओळख नाही

अनेकदा शुक्राचार्यांची ओळख ही केवळ ‘असुरांचे गुरु’ म्हणूनच करून दिली जाते, ज्यामुळे त्यांना केवळ एक खलनायक समजले जाते. मात्र, पौराणिक आणि महाभारतातील कथांनुसार शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र होते. त्यांना ‘काव्य’ आणि ‘उशना’ या नावांनीही ओळखले जात असे.

ते केवळ असुरांचे मार्गदर्शक नव्हते, तर अत्यंत प्रखर तपस्वी, कुशल रणनीतीकार, बुद्धिवान आणि मंत्रविद्येचे महान ज्ञानी मानले जात असत. देव आणि असुरांच्या युद्धात देवगुरु बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्यातील बुद्धिमत्तेची आणि रणनीतीची मोठी परीक्षा पाहायला मिळत असे.

मृत असुरांना जिवंत करणारी ‘मृत संजीवनी’ विद्या

शुक्राचार्यांकडे होती, ज्याद्वारे ते मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करू शकत असत. देव आणि असुर संग्रामात जेव्हा एखादा असुर मारला जाई, तेव्हा शुक्राचार्य या विद्येच्या जोरावर त्याला पुन्हा जिवंत करत असत.

ही विद्या शिकण्यासाठी देवगुरु बृहस्पतींचा मुलगा ‘कच’ हा शुक्राचार्यांच्या आश्रमात शिष्य बनून गेला होता. असुरांनी कचला मारण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी शुक्राचार्यांनी त्याला जिवंत केले. एकदा असुरांनी कचची राख दारूमध्ये मिसळून शुक्राचार्यांना पाजली. तेव्हा शुक्राचार्यांनी आपल्या पोटात असलेल्या कचला स्वतः मृत संजीवनी विद्या शिकवली, जेणेकरून तो बाहेर आल्यावर आपल्या गुरूंना पुन्हा जिवंत करू शकेल.

राजा बळीला दिलेली वामन अवताराची पूर्वसूचना

दानवीर राजा बळीच्या कथेतही शुक्राचार्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेऊन तीन पावले जमिनीची मागणी केली, तेव्हा शुक्राचार्यांनी वामनाला ओळखले होते. त्यांनी राजा बलीला दान न देण्याबाबत सावध केले होते, जे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि कुशल गुरु असण्याचे प्रतीक मानले जाते.

‘महाकाली’ चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा

अक्षय खन्नाच्या या नव्या लूकमुळे चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘महाकाली’ हा चित्रपट शुक्राचार्यांचे केवळ एक उग्र रूप दाखवणार की त्यांच्यातील ज्ञानी, तपस्वी आणि रणनीतीकार असलेल्या पैलूलाही समोर आणणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *