नवी दिल्ली : समाजसेवक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या भीषण घडामोडींवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी मोठा खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, लाठ्यांना लावलेले खिळे आणि पेलेट गनचा वापर आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असे सांगत 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती, याचा संपूर्ण पट त्यांनी मांडला आहे.
‘एबीपी माझा’च्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना अभिजीत दिपके यांनी आंदोलनातील चढ-उतार आणि सीजेपीच्या (Cockroach Janata Party) भविष्यातील वाटचालीवर सविस्तर भाष्य केले.
NEET UG Protest Delhi : 20 जुलैला नेमकं काय झालं?
सोनम वांगचुक यांचं उपोषण मोडल्यानंतर पुढचे पाच दिवस कसे होते यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “ते पाच दिवस आमच्यासाठी खूप धक्कादायक होते. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्या लाठ्यांना खिळे लावण्यात आले होते. पेलेट गनचा वापर करण्यात आला. ते आमच्यासाठी खूपच वेगळं आणि धक्कादायक आहे. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी आम्हाला सातत्याने मार्गदर्शन केलं. मी वांगचुक यांना भेटण्यासाठी गेलो असता मला भेटू दिलं नाही.”
अभिजीत दिपके म्हणाले की, “मी आंदोलनासाठी बसलो होतो त्यावेळेपासून रोज सांगायचो की, बाहेरून काही लोक येतील आणि ते आंदोलनाला बदनाम करतील. नेमकं तेच झालं. आंदोलनात बाहेरचे लोक आले. 19 जुलैच्या रात्री दगडाने भरलेला ट्रक आला होता. 20 जुलै रोजी पहाटे पाच वाजता मी त्याचा व्हिडीओ शेअर केला. त्या ठिकाणी एक मोडलेली व्हॅन त्या ठिकाणी होती. आम्ही महिनाभर आंदोलन केलं, मात्र काहीही झालं नाही. पण 20 जुलै रोजी आम्ही संसदेवर मोर्चा काढणार होतो, त्यावेळीच हे कसं झालं?”
Jantar Mantar Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश
अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांवर इतकं मारा की यापुढे त्यांची कोणतंही आंदोलन करण्यासाठी हिंमत झाली नसली पाहिजे, असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. त्यातून एका 12 वर्षांच्या मुलीला मारलं. एका पोलीस अधिकाऱ्याने 17 वर्षांच्या मुलीचा गळा आवळल्याचं मी पाहिले. त्यातून विद्यार्थ्यांना एक संदेश द्यायचा होता. त्यावेळी सगळे विद्यार्थी चिडले आणि कोणत्याही परिस्थितीत संसदेकडे जायचं त्यांनी ठरवलं. पण लाठीचार्ज झाल्यानंतर मी संसदेकडे जायचं नाही असं सांगितलं. त्यावेळी सगळे विद्यार्थी माझ्यावर चिडले. कुणाचाही जीव जायला नको असा उद्देश त्यामागे होता.”
Abhijeet Dipke Interview : सगळे सोबत आले अन् जंतरमंतर भरलं
अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, “त्यावेळी अनेकजण मला सोडून गेले. त्यावेळी सगळं आंदोलन संपलं असंच वाटलं. त्यावेळी सगळी आशा संपली असंच मला वाटलं, सगळी मेहनत वाया गेल्याचं मला वाटलं. त्यावेळी फुटपाथवर अर्धा तास मी रडत बसलो होतो. त्यावेळी काहीजण सोबत आले आणि पुढे काय करायचं हे त्यांनी विचारलं. हळूहळू गर्दी वाढत गेली. मी आता इथून उठणार नाही, असंच मी ठरवलं. त्याचवेळी सोबत असलेले सगळे तिथेच बसले. हे सगळं पाहिल्यानंतर मला धीर आला. आता या ठिकाणाहून हलायचं नाही असं मी ठरवलं. लोक आपल्यासोबत आहेत, याची जाणीव झाली.”
मी जंतरमंतरवर स्टेजकडे गेल्यानंतर रात्री साडे दहाच्या दरम्यान पुन्हा गर्दी झाली. हा एक चमत्कार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा मोठी गर्दी झाली. पूर्ण जंतरमंतर पुन्हा भरलं. ज्या ठिकाणी माझी आशा संपली होती त्यावेळी या लोकांनी मला पुन्हा साथ दिली.
CJP Future Plan : कॉकरोच जनता पार्टीची पुढची दिशा काय?
आमच्याकडे पूर्णवेळ स्वयंसेवक आहेत. वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यासाठी एक गट निर्माण करू. एखाद्या प्रश्नावर आम्ही शक्य तेवढे पर्याय वापरू आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करू. राजकीय दबाव गट म्हणून काम करणार. जितके जास्त राजकीय दबाव गट असतील तेवढं चांगलं आहे. पुढच्या पाच वर्षानंतर आम्ही आऊटडेटेड असू, त्यावेळी आणखी कुणीतरी चळवळ उभी करतील आणि हेच लोकशाहीसाठी उपयुक्त आहे. एकाच व्यक्तीच्या किंवा राजकीय पक्षाच्या भोवती जर आशा लावून बसलो तर ते लोकशाहीसाठी घातक ठरेल.
Delhi 20 July Incident : सरपंच व्हायचं होतं
अभिजीत दिपके म्हणाले की, लहानपणी सुट्टीच्या वेळी गावी जायचो. त्यावेळी तिथली स्थिती पाहायचो. पाणी नाही, लाईट नाही, चांगले रस्ते नाहीत अशी स्थिती. मी चांगल्या शाळेत जायचो, तर माझ्या काकांची आणि आत्याची मुलं मात्र पडक्या शाळेत जायचे. त्यावेळी लहानपणी सारखं वाटायचं की गावासाठी काहीतरी करायचं आहे. शाळा चांगल्या करायच्या आहेत, रुग्णालय आणायचं आहे, रस्ते चांगले करायचे आहेत. त्यासाठी मला गावाचा सरपंच व्हायचं होतं. आता सीजेपीच्या माध्यमातून हेच काम देशासाठी करू शकतो आणि ते आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो.
Abhijit Dipke Jantar Mantar Protest : आताचा भारत वेगळा
जेव्हा मी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात होतो त्या काळातील भारत आणि आताचा भारत हा वेगळा आहे. आता जात आणि धर्मावरून भेदभाव केला जातो. आताचं राजकारण हे फोडाफोडीचं आहे. तेव्हा काहीतरी लोकशाही शिल्लक होती, आता लोकशाही शिल्लक उरली नाही.
ही बातमी वाचा:
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय