झिम्बाब्वेच्या ‘या’ खेळाडूने रचला नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू, रोहित शर्माला टाकलं मागं


Brendan Taylor Record : झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलरने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्माला मागे टाकलं आहे. टेलर आता सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू ठरला आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामना 28 जून रोजी हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यासाठी खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये ब्रेंडन टेलरचा समावेश आहे. या कसोटी सामन्यामुळे त्याने सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा विक्रम प्रस्थापित केला.

आता 40 वर्षीय टेलरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 22 वर्षे आणि 73 दिवसांची आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वेचाच दुसरा क्रिकेटपटू ग्रॅमी क्रेमर आहे. 39  वर्षीय क्रेमरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 21 वर्षे आणि 54 दिवसांची आहे. या यादीत त्यानंतर बांगलादेशचे मुशफिकुर रहीम आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक काळ कारकीर्द असलेले सक्रिय खेळाडू

ब्रेंडन टेलर – 22 वर्षे 73 दिवस (आंतरराष्ट्रीय कारकीर्द)
ग्रॅम क्रेमर – 21 वर्षे 54 दिवस (आंतरराष्ट्रीय कारकीर्द)
मुशफिकुर रहीम – 21 वर्षे 37 दिवस (आंतरराष्ट्रीय कारकीर्द)
रोहित शर्मा – 18 वर्षे 362 दिवस (आंतरराष्ट्रीय कारकीर्द)

ब्रेंडन टेलरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

झिम्बाब्वेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या ब्रेंडन टेलरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 36 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 59 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 71 कसोटी डावांमध्ये त्याने 35.86 च्या सरासरीने 2403 धावा केल्या, ज्यात 6 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 171 होती.

205  एकदिवसीय डावांमध्ये फलंदाजी करताना टेलरने 35.28 च्या सरासरीने 6704 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 11 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 145 आहे. उर्वरित 57 टी 20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये या झिम्बाब्वेच्या खेळाडूने 24.32 च्या सरासरीने आणि 122.33 च्या स्ट्राइक रेटने 1216 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 123 आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *