‘देवेंद्र फडणवीस-गडकरींची पंखछाटणी? उद्धव ठाकरेंचा थेट संघाला सवाल, ‘गुजरात लॉबी’ पुन्हा चर्चेत – Marathi News | Uddhav Thackeray Direct Appeal to RSS Questions Trimming of Wings of Gadkari and Fadnavis


मुख्यमंत्री फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे, अशी प्रार्थना साईबाबांकडे केल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. PM पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात, म्हणून यांचा पत्ता आताच कापावा, असं काही जणांना वाटत आहे, असा इशारा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलंय.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत?

‘मी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन आल्यावर मीडियाने नेहमीप्रमाणे विचारलं, की काय प्रार्थना केलीत. मी म्हटलं, मी एकच प्रार्थना केली की या देशावर आणि राज्यवर जे एक संकट आलेलं आहे, ते अरिष्ट दूर कर, ही भ्रष्ट राजवट गाडून टाक, देशाला सुजलाम सुफलाम दिवस येवो.’ पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की पत्रकारांनी पुन्हा विचारलं आणखी काय मागितलं? यावर ते म्हणालेत की, देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून माझ्या मनात भिरभिरतंय, हा निसर्गाचा नियम आहे, मी कोणाचं वाईट चिंतणारा नाही. कोणाचं वाईट व्हावं असं मला सुचत नाही, आणि सुचूही नये, अशी साईबाबांकडे प्रार्थना आहे. पण प्रत्येकाला शेवट असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस?

2029 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपल्याला वाली कोण, अशी चर्चा दिल्लीत सुरु झाली आहे. प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटू लागले आहेत. तो झाला मी का नाही, रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात, म्हणून यांचा पत्ता आताच कापावा, असं काही जणांना वाटत आहे. त्यामुळे यांना इतकं परेशान करा, की हे दिल्लीपर्यंत येऊच नयेत. ’

‘पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण आहे, तुम्हाला माहितच आहे, त्यांनी शाहसेनेच्या प्रमुखाला सुपारी दिली आहे. मिंधे गट, एसंशि गट, की यांना गुंतवा इथे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांची सुरू असलेली ही राजकीय छाटाछाटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरोखरच मान्य आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.

गडकरी आणि फडणवीसांचे दिले उदाहरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत भाजपला कोंडीत पकडले.

नितीन गडकरींचे दिले उदाहरण; राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उल्लेख

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजपमध्ये सध्या निष्ठावंतांची कशी कोंडी केली जात आहे, हे सांगताना उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उदाहरण दिले.

संघाने आता भूमिका स्पष्ट करावी

उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाहीरपणे प्रश्न विचारत, ठाकरेंनी संघाच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. दिल्लीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील नेतृत्त्व संपवण्याचा हा डाव आहे का, साही सवाल आता उपस्थित होत आहे.

पंतप्रधान पदासाठी कोणाची चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पक्षातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून अमित शाह यांच्या नावाचा विचार सर्वात आधी केला जातो. भाजपमधील प्रखर हिंदुत्वाचा चेहरा आणि देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता खूप मोठी आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये त्यांच्या नावाला मोठी पसंती दिली जाते. आपल्या कामाच्या धडाक्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांमध्ये गडकरींचा आदर केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणूनही त्यांच्या नावाकडे पाहिले जाते, ज्यामुळे कठीण राजकीय परिस्थितीत त्यांचा चेहरा पुढे येऊ शकतो अशी नेहमी चर्चा असते. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव आधीपासूनच चर्चेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *