Passport Fee Rise नवी दिल्ली : देशभरात पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा मानायचा की नाही यावरुन चर्चा सुरु आहे. याचवेळी विदेश मंत्रालयाकडून पासपोर्ट फीमध्ये वाढ केली आहे. नवे शुल्क येत्या 1 जुलै 2026 पासून लागू केलं जाणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून पासपोर्टसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
पासपोर्ट शुल्क किती वाढलं?
सध्या 36 पानांचा पासपोर्ट बनवण्यासाठी 1500 रुपये शुल्क भरावं लागायचं. नव्या दरवाढीमुळं त्यासाठी 2500 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर, 60 पानांच्या पासपोर्टसाठी 2000 रुपयांऐवजी 3500 रुपये द्यावे लागतील, म्हणजेच 1500 रुपये अधिक खर्च करावे लागतील. जर एखाद्या पासपोर्ट धारकाचा पासपोर्ट खराब झाला आणि नव्यानं पासपोर्ट तयार करायचं असेल तर त्यासाठीचा खर्च देखील वाढला आहे. अशा प्रकारच्या पासपोर्टसाठी 3000 रुपयांऐवजी 5000 रुपये मोजावे लागतील.तर, 60 पानांच्या पासपोर्टसाठी 6000 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 3500 रुपये होतं.
तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार
एखाद्या नागरिकाला तात्काळ पासपोर्ट हवा असेल तर त्यासाठी देखील अधिक खर्च करावा लागेल. 36 पानांच्या तात्काळ पासपोर्टसाठी यापूर्वी 3500 रुपये शुल्क द्यावं लागायचं, आता 5000 रुपये शुल्क आकारलं जाईल. 60 पानांच्या तात्काळ पासपोर्टसाठी यापूर्वी 4000 रुपये शुल्क होतं ते वाढून 6000 रुपये झालं आहे.
मुलांच्या पासपोर्टचं शुल्क वाढलं
18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या 36 पानांच्या पासपोर्टसाठी आता 1000 रुपयांऐजी 1750 रुपये शुल्क भरावं लागेल. मुलांचा पासपोर्ट खराब झाल्यास 2000 रुपयांऐवजी 4250 रुपये भरावे लागतील.
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र महागलं
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र, सरेंडर प्रमाणपत्र किंवा ग्लोबल एंट्री प्रोग्रॅम सारख्या सेवांचं शुल्क आता 500 रुपयांनी वाढून 750 रुपये झालं आहे.
कोणाला सूट मिळणार?
सरकारनं पासपोर्टच्या शुल्कात वाढ करताना काही नागरिकांना दिलासा देखील दिला आहे. 8 वर्षांपर्यंतची मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांना पासपोर्ट शुल्कात 10 टक्के सवलत मिळेल. ही सूट नव्या पासपोर्टवर असेल, पासपोर्ट दुसऱ्यांदा बनवताना उपलब्ध नसेल. पासपोर्ट शुल्क वाढलं असलं तरी त्याची वैधता पहिल्या प्रमाणं कायम असेल. मुलांचा पासपोर्ट 5 वर्ष किंवा 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि प्रौढ व्यक्तींचा पासपोर्ट 10 वर्ष वैध असेल.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!