Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं


मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून धडाडीची कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या परभणीच्या पालक सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी (Guardian Secretary) देण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असताना, 23 फेब्रुवारी 2026 रोजी तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात होती.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे या आधी मंत्रालयात सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी (Parbhani Guardian Secretary) देण्यात आली होती. आता तुकाराम मुंढे हे सचिव नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली पालक सचिवपदाची जबाबदारी आता दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी असेल. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत.  

What Is Guardian Secretary : पालक सचिव म्हणजे काय? 

एखाद्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाकडून पालक सचिवपदी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्तील केली जाते. हे पद महत्त्वाचं मानलं जातं. त्या माध्यमातून शासनाचे धोरणात्मक निर्णय, कल्याणकारी योजना यांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवाकडे असते. 

संबंधित जिल्ह्याच्या पालक सचिवाला वर्षातून चार वेळा किंवा तीन महिन्यातून किमान एकदा दौरा करून विकासकामांचा आढावा घ्यावा लागतो. त्या जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके उपाय सूचवण्याची, तसा अहवाल सूचवण्याची जबाबदारी पालक सचिवावर असते. 

Tukaram Mundhe FDA Action : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेताच धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करत त्यांनी अनेक ठिकाणच्या भेसळ उघडकीस आणल्या. तसेच त्यांनी या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यभरात भेसळ करणाऱ्या व्यापारी आणि दलालांचे धाबे चांगलेच दणाणल्याचं चित्र आहे. 

तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य लोकांमधून कौतुक केलं जात आहे. या कारवायांमुळे व्यापाऱ्यांच्या दबावात येऊन अन्न व औषध प्रशासनामधून त्यांची बदली करण्यात येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *