Vidarbha Heat Wave: देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केलं आहे. राज्यात कुठे 45 तर कुठे 46 अंशापर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. अशातच गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात पुन्हा उष्णतेचा हाहा:कार (Vidarbha Heat Wave) बघायला मिळतो आहे. सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. अंगाची लाही-लाही करणारी उष्णतेची लाट अक्षरशः होरपळून काढत असल्याचे चित्र आहे. अशातच नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र, दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा
23 मे 2026: अकोला, अमरावतीसह वर्ध्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आले असून या ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे.
24 मे 2026: अकोला, अमरावती यवतमाळसह वर्ध्याला रेड अलर्ट देण्यात आले असून या शहरात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आले असून या ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे.
25 मे 2026: नंतर उष्णतेची लाट काही प्रमाणत सौम्य होण्याची शक्यात आहे. अकोला, अमरावती यवतमाळसह वर्ध्याला या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून या शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा, गोंदिया वाशिम आणि बुलढाण्याच्या कुठलाही अलर्ट नसणार आहे. संभाव्य उष्णतेची लाट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Gondia: तब्बल 12 वर्षांनंतर गोंदिया जिल्ह्याचे तापमान विक्रमी अंशावर, शेतमजुराचा उस्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
मागील तीन-चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, उष्णतेने गेल्या 12 वर्षातील नीचांक मोडला आहे. सन 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्याचे तापमान 45.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर, तब्बल 12 वर्षांनी यंदा तापमानाचा पारा काल 45.2 अंशावर पोहोचला आहे. या भीषण उन्हाळ्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचे तीव्र आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे.
Gadchiroli: गडचिरोलीत अति उष्णतेची लाट जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर, इतिहासात उच्चांकी तापमानाची नोंद
गडचिरोलीच्या इतिहासात काल उच्चांची 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात अतिउष्णतेची लाट घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. उष्माघाताच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष 24 तास सुरू करण्यात आले आहेत. या विशेष कक्षांमध्ये कूलर, वातानुकूलित सुविधा, विशेष बेड आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आलाय. ओआरएस, आयव्ही फ्लूइड्ससह आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक सुविधा तयार ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर दुर्गम भागात आशा स्वयंसेविकांमार्फत जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खबरदारी बाळगावी, आपत्कालीन मदतीसाठी 108 आणि 102 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा