Sanjay Dina Patil Operation Tiger: माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर एकतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल, असा आक्रमक भाषेत ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला. संजय दिना पाटील यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांना सावधानतेचा इशारा दिला.
मला पोलीस संरक्षण नको ही माझी विनंती आहे. पोलीस माझ्यासोबत असतील तर मी त्यांना कसा मारु शकतो, पोलीस मला अडवतील. मी वाट बघतोय, पोलीस माझ्यासोबत नसावेत आणि ते लोक हल्ला करायला येऊ देत, म्हणजे मी त्यांना मारु शकेन. मला त्यांच्यापासून भीती नाही, माझ्यापासून त्यांना भीती आहे. पोलीस नसले तरी आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. एकदा असं झालं होतं, तुमच्या आजोबांच्या काळातील लोक असतील तर त्यांना विचारा. तेव्हा माझ्या वडिलांच्यावेळी काहीजण हल्ला करायला आले होते, तेव्हा पाच लोकं आम्ही मारले होते. ते काही भाई लोकांच्या जीवावर असतील पण आम्ही स्वत:च्या जीवावर लढणारे आहोत, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.
यावेळी संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटातील एका नेत्याविषयी वारंवार असंतोष व्यक्त केला. या नेत्यामुळेच मी ठाकरे गट सोडत असल्याचे त्यांनी म्हटले. या व्यक्तीने माझ्या घरासमोर येऊन शिव्या दिल्या. त्याने घरासमोर येऊन माफी मागितली तर मी मातोश्रीवर यायला तयार आहे, असे मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. मी विभागप्रमुख म्हणून त्याला खूप आदर दिला. त्याची कुत्र्यासारखी अवस्था आहे, तो लोकांना सर्वांदेखत शिव्या देतो. मला चार लोकांसमोर शिव्या द्यायची त्याची हिंमत नाही. दादा लोकांच्या जीवावर वाघ बनणं सोडून द्या. आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारु. तुम्ही कितीही सुरक्षाव्यवस्था ठेवा, मी बॉम्ब टाकेन, असा इशारा संजय दिना पाटील यांनी दिला.
Uddhav Thackeray: त्यावेळी उद्धव ठाकरे हात जोडून मला म्हणाले… संजय दिना पाटलांनी काय सांगितलं?
उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलीला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट दिलं. पण माझी मुलगी किंवा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो. ती जागा मनसेला जाऊ नये म्हणून राजुल पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. राजुल पाटील या माझं मतदारसंघातील काम बघत होत्या, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उभं राहायची त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्याने ती मनसेला जाऊ नये या एका कारणासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन ठाकरे गटाने ती जागा आपल्याकडे घेतील. मी या जागेवरुन माझ्या मुलीसाठी नव्हे तर माझ्यासोबत अनेक वर्षे काम करणाऱ्या मामी मंचेकर यांच्यासाठी तिकीट मागत होतो. कारण मुलुंडची जागा मनसेच्या अभिजीत चव्हाण यांना गेली होती. मी मामी मंचेकर यांच्यासाठी कांजूर पूर्वेच्या वॉर्डमधून तिकीट मागितले होते. मला त्यांचा एबी फॉर्म घ्यायला मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. मात्र, त्यावेळी एक फोन आला आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणाले, संजय माझी अडचण होत आहे. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना म्हणालो, साहेब तुम्ही हात जोडू नका, तुम्ही आदेश द्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मामी मंचेकर यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं मान्य केलं. मात्र, नंतर ते ही बारगळलं, असे संजय दिना पाटील यांनी सांगितले.
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांच्या रडारवर असलेला तो व्यक्ती कोण?
शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे माझ्याशी चांगलं वागले, त्यांनी सगळं सहकार्य केलं. माझा त्यांच्याशी कोणताही वाद नाही. फक्त एक आमचा नेता आहे, त्यांच्याशी आम्हाला प्रॉब्लेम होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा राष्ट्रवादीचा मुंबईत फारसा प्रभाव नव्हता. मी ठाकरे गटात माझ्या कार्यकर्त्यांसाठी प्रवेश केला, हे मी उद्धव ठाकरे यांनाही सांगितले होते. पण एका नेत्याने माझ्या एकाही समर्थकाला पदाधिकारी होऊ दिले नाही. माझ्या 40 शाखा प्रमुखांपैकी एकालाही निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. हा नेता सत माझ्या माणसांची कामं अडवायचा, त्यांना अपमान करायचा. आम्ही पाच वर्ष वाट बघितली, खासदार झाल्यावर परिस्थिती बदलेल, असे वाटले पण तसं झालं नाही. मी या व्यक्तीच्या माध्यमातून ठाकरे गटात प्रवेश केला नाही किंवा त्याच्यासोबत पक्षात गेलो नाही, याचा त्या व्यक्तीला राग होता. या व्यक्तीला इतरांनी आपल्याला पाया पडावे, असे वाटते. तो उभा राहिला की 10 लोकं जमतात आणि मी कुठेही उभा राहिलो की 100 लोकं जमतात, याचा या व्यक्तीला राग येतो, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले. मात्र, हा व्यक्ती किंवा नेता कोण, हे संजय दिना पाटील यांनी नाव घेऊन सांगितले नाही.
आणखी वाचा
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story