Team India ODI Squad For England Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी इंग्लंडविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या नेतृत्वाखाली पहिली वनडे मालिका जिंकणाऱ्या गिलवर आता इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल. जुलै 2022 नंतर भारतीय संघाचा हा पहिलाच इंग्लंड वनडे दौरा आहे.
दिग्गजांचे पुनरागमन, हार्दिकला डच्चू
या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी संघात काही मोठे बदल केले आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2026 च्या फायनलदरम्यान विराट कोहली जखमी झाला होता, ज्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेबाहेर होता, पण आता त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याचे खेळणे अद्याप त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. दुसरीकडे, अनुभवी जसप्रीत बुमराह 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पहिल्यांदाच निळ्या जर्सीमध्ये वनडे मॅच खेळताना दिसणार आहे. तसेच, मागील तीन मालिकांमधून वगळण्यात आलेल्या अक्षर पटेलचेही दीर्घकाळानंतर पुनरागमन झाले आहे. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा या दौऱ्यासाठी विचार करण्यात आलेला नाही.
यशस्वी जैस्वालला वगळल्याने सर्वांनाच धक्का
या संघ निवडीतील सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघातून बाहेर ठेवणे हा होता. जैस्वालने शनिवारीच अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शानदार नाबाद शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता, तरीही रविवारी जाहीर झालेल्या संघात त्याला स्थान मिळू शकले नाही. जैस्वालव्यतिरिक्त देशांतर्गत मालिकेत अपयशी ठरलेला फिरकी अष्टपैलू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यांना खराब कामगिरीचा फटका बसला असून त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
🚨 News 🚨
India’s ODI squad for the England tour announced.
𝗡𝗢𝗧𝗘: Varun Chakaravarthy has been ruled out of the Ireland T20I Series as he continues his rehab at the BCCI COE.
More Details ▶️ https://t.co/wOdXTQqJto #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/t0GypgM4kp
— BCCI (@BCCI) June 21, 2026
‘या’ 12 खेळाडूंवर विश्वास कायम
कर्णधार शुभमन गिलव्यतिरिक्त निवडकर्त्यांनी मागील दौऱ्यातील मुख्य खेळाडूंवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. संघात एकूण 12 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या अनुभवी फलंदाजांचा समावेश आहे. अष्टपैलू विभागात वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी आपले स्थान वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. तर गोलंदाजीची धुरा कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि हर्षित राणा यांच्या खांद्यावर असेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India ODI Squad For England Tour) :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला