धाराशिव : ठाकरे यांच्या शिवसेनेत एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. मी अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. त्यानंतरच मी ठाकरे गटात कायम राहायचं की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा हे ठरवणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ओमराजे यांच्या या भूमिकेनंतर एकच खळबळ उडाली असून शिंदे गट त्यांना पक्षात घेण्यासाठी सक्रीय झालेला होता. ठाकरे गटाकडूनही त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाने आमदार तानाजी सावंत यांच्यावर ओमराजे यांना पक्षात आणण्याची जबाबदारी सोपवली होती. आता ही जबाबदारी तानाजी सावंत यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे समोर आले आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांनी स्वत:च मी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशी घोषणा केली.
तानाजी सावंत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक
आमदार तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्यावर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली होती. ओमराजे यांची बैठक सुरू असलेल्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर तानाजी सावंत यांचे समर्थक थांबलेले होते. तानाजी सावंत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माणसांना जर कोण धमकी देत असेल आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणत ओमराजे यांच्या प्रवेशासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते सज्ज असलेले पाहायला मिळाले.
ओमराजे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध
खुद्द आमदार तानाजी सावंत यांनीच ओमराजे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाष्य केले. ओमराजांचे पहिले पाच वर्षे विरोधात गेले आणि दुसरी टर्म सुरू राहिली तरी परिस्थिती तशीच राहिली. ओमराजे यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध आहेत. माझं कोणाशीही वाकडं नाही. या भागाचा विकास करायचा असेल तर आम्हाला एकत्र येऊन काम करावे लागेल. ओमराजेंचा प्रवेश होईल, असे सावंत म्हणाले होते. आता ओमराजे यांनी मी शिवसेनेत जाणार आहे, असे सांगितले आहे.