Last Updated:
Omraje Nimbalkar: अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले.
धाराशिव : गेल्या चार दिवसांपासून ओमराजे निंबाळकर काय करणार? एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार की पुन्हा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काम करण्याचा शब्द देणार? अशा चर्चा होत होत्या. अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचे सांगत सत्ता आणि पदासाठी मी निर्णय घेणारा माणूस नाही, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले. त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाले आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जीवाभावाच्या लोकांना मी भेटलो. मते जाणून घेतली. चार तासांपासून चर्चा करीत होतो. सगळ्यांशी चर्चा करून त्यांची प्रामाणिक मते जाणून घेतली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढत असतानाही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये आम्हाला यश मिळू शकले नाही. सामान्य कार्यकर्ते वाईट पद्धतीने पराभूत झाले. त्याची कारणे कळायला मार्ग नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.
…म्हणून उद्धव ठाकरे यांची साथ सोडायचा निर्णय- ओमराजे निंबाळकर
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशालीवर उमेदवार उभे होते. आम्ही प्रामाणिकपणे काम केले. लढाऊ बाण्याने निवडणुका लढवल्या. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. शेवटच्या आम्ही राजकारणी कार्यकर्त्यांच्या भरोशावरच निवडणुका लढवत असतो. सत्ता नसल्याने कामे करता येत नाहीत, त्यामुळे आपण निवडणुका हरलो, असे आमच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे पडले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सोडायला भाग पडले, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
मातोश्रीवर कुणीही काही बोलणार नाही-ओमराजे निंबाळकर
आज जरी राजकीय भूमिका वेगळी घेतलेली असली तरी मातोश्रीच्या विरोधात कुणीही काहीही बोलता कामा नये, अशी सक्त ताकीद ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. पैसा आणि पदाच्या हव्यासापोटी मी कधीच कोणता निर्णय घेत नाही. ओमराजे त्या स्वभावाचा नाही. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी निर्णय घेतला नाही. माझा कोणताही व्यवसाय नाही, जो वाचविण्यासाठी मला सत्तेच्या आश्रयाखाली जावे लागत आहे, असे सांगायला देखील ओमराजे निंबाळकर विसरले नाहीत.
Osmanabad,Maharashtra
