महायुतीची पत्रकार परिषद Image Credit source: टीव्ही 9 मराठी
राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यंदा राज्यावर अल निनोचं सावट आहे. त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सरकारने आतापर्यंत काय तयारी केली असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान विरोधकांच्या पत्रकार परिषदेनंतर आता सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्यापासून तीन आठवडे पावसाळी अधिवेश चालणार आहे, विरोधक चहापानासाठी आले असते तर चर्चा झाली असती. सामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, यावर अधिवेशनात प्रयत्न केले जातील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान विरोधकांनी कर्जमाफीवरून काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याला देखील यावेळी फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
परिस्थिती पाहून कर्जमाफी करावी लागते, समितीच्या अहवालानुसार काही निकष लावले आहेत. 36 हजार 586 कोटींच्या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
सरकार चुकत असेल तर विचारा पण बिनबुडाचे आरोप करू नका, लोकांचे प्रश्न विरोधकांना अवगतच नाहीयेत, आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही, कोणत्याही निवडणुका नसताना कर्जमाफी केली आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.