नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल


Anjali Nimbalkar: नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजप जेडीएसला तगडा हादरा देत पाचवी जागा मताधिक्य नसतानाही निवडून आणली. त्यामुळे देशात भाजपकडून फोडाफोडी सुरु असतानाच डीकेंनी तोच कित्ता गिरवत भाजपला धोबीपछाड दिला. दरम्यान, आता फुटलेल्या भाजप आमदारांची सुद्धा चर्चा सुरु झाली असून भाजप हायकमांडने त्यांची गंभीर दखल घेतली आहे.

मला बळीचा बकरा बनवण्यात आले का? 

हे प्रकरण ताजे असताना भाजपच्या फुटीर आमदारांमध्ये खानापूरचे भाजप आमदारांचे नाव आल्याने काँग्रेसच्या माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांनी आता थेट सवाल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्यात आले का? असा थेट सवाल केला आहे. ज्या नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांच्यासाठी पक्षाची विचारधारा काही महत्त्व ठेवतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असल्याचे अंजली निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

अंजली निंबाळकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सत्य आता सर्वांसमोर आले आहे! नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीचे निकाल सर्व काही स्पष्ट करत आहेत. मला आनंद आहे की आपल्या ‘कर्नाटक काँग्रेस’चे सर्व उमेदवार जिंकले. विरोधी पक्षातील क्रॉस व्होटिंग त्यांची फूट दर्शवते, पण जेव्हा मी खानापूरच्या भाजप आमदाराच्या मतदानाचे नाव वाचते तेव्हा मला आश्चर्य वाटते. याचा अर्थ असा आहे का 2023 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते आणि खानापूरमधून काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाचे मुख्य कारण तेच होते? याचा अर्थ असा आहे का त्यांनी तेव्हाही संगनमताने काम केले होते? एक मोठा कट समोर येत आहे. नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्यात आले का? ज्या नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला त्यांच्यासाठी पक्षाची विचारधारेचा काही अर्थ आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. 

काय घडलं होतं 2023 च्या निवडणुकीत?

दरम्यान, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे भाजपचे आहेत. त्यांनी क्रास व्होटिंग केल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या अंजली निंबाळकर यांचा कडवी लढत देऊनही त्यांच्याविरोधात निसटता पराभव झाला होता. निवडून आल्या असत्या तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी होती. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी अंजली निंबाळकर यांचा थेट संपर्क आहे. तसेच त्या माजी सीएम सिद्धरामय्या यांच्याही अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी नेत्यांनी त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी थेट हस्तक्षेप करून विरोधात मतदान करायला लावल्याची चर्चाही त्यावेळी रंगली. कर्नाटकातील एका बड्या नेत्याने खानापुरातील स्थानिक नेत्यांना अनेक फोन केल्याची सुद्धा चर्चा झाली.

कोण आहेत अंजली निंबाळकर?

दुसरीकडे, काँग्रेसमधील 17 आमदार फुटले तेव्हा अंजली निंबाळकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती. परंतु पक्षनिष्ठा आणि विचारसरणी सोडली नाही. परंतु काँग्रेसमधील काही नेत्यांनी विचारसरणीला छेद देऊन पक्षविरोधी कारवाया केल्याने निंबाळकरांना विधानसभा निवडणुकीत फटका बसला. डाॅ. अंजली या स्वतंत्र विचारधारेच्या आणि उच्चशिक्षित असून विधानसभेत सर्वाधिक लक्षवेधी त्यांनी मांडल्या आहेत. खानापूरच्या इतिहासात स्थानिक प्रश्नांवर सर्वाधिक प्रश्न मांडणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती राहिली. 2021च्या महापुरात त्यांनी पाण्यात उतरून 10 दिवस मदत केली होती. त्यांची मुलींचे शिक्षण आणि महिलांच्या आरोग्यावर आग्रही भूमिका राहिली. पावसाळ्यात मुलांना शिक्षणासाठी साकवावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पक्का पूल बांधून समस्या सोडवली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *